India Must Put Pressure On Israel Says Iran: भारतासारख्या देशांनी जे ग्लोबल साऊथचा आवाज आहेत आणि ज्यांना शांतता हवी आहे, त्यांनी इस्रायलवर दबाव आणला पाहिजे, असे भारतातील इराणचे उपराजदूत मोहम्मद जावेद होसेनी यांनी शुक्रवारी म्हटले आहे. इराण-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारताने इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

“आम्हाला वाटते की हे हल्ले लवकरात लवकर थांबवले गेले पाहिजेत आणि हे संयुक्त आंतरराष्ट्रीय प्रयत्नांद्वारे शक्य आहे”, असे होसेनी यांनी म्हटल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

“भारतासारखे देश, जे ग्लोबल साऊथचा आवाज आहेत आणि शांततेचे समर्थक आहेत, त्यांनी समन्वय साधून इस्रायलवर दबाव आणला पाहिजे. पहिले पाऊल म्हणून त्यांनी या कृतीचा निषेध केला पाहिजे, जेणेकरून भविष्यात असे पुन्हा घडणार नाही”, असे इराणचे उपराजदूत पुढे म्हणाले.

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील इस्रायली सरकार कोणतेही आंतरराष्ट्रीय नियम न पाळता, विरोधकांवर हल्ले करून प्रादेशिक वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

“इस्रायली सरकार आणि अधिकारी कोणत्याही नियमांचे पालन करत नाहीत. त्यांचे एकमेव ध्येय प्रादेशिक वर्चस्व मिळवणे आहे. त्या ध्येयासाठी ते त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाचे बलिदान देण्यास, त्यांना मारण्यासही तयार आहेत,” असे इराणचे उपराजदूत म्हणाले.

इराणचे उपराजदूत मोहम्मद जावेद होसेनी पुढे म्हणाले की, “ते (इस्रायल) लोकांना मारतात आणि तरीही स्वतः पीडित असल्याचे म्हणतात. हे हास्यास्पद आहे. इराण शांततेच्या बाजूने आहे आणि जगातील प्रत्येक युद्धाला आमचा विरोध आहे.”

शांततेसाठी प्रामाणिकपणे पुढाकार घेणाऱ्यांचे स्वागत करताना, होसेनी म्हणाले की, इराण लादलेली शांतता कधीही स्वीकारणार नाही.

“आम्ही शांततेसाठी प्रामाणिकपणे पुढाकार घेणाऱ्यांचे स्वागत करतो. मात्र आमच्यावर लादलेली कोणतीही गोष्ट, जरी ती शांततेच्या नावाखाली सादर केली गेली तरी आम्ही स्वीकारणार नाही. आमच्या नेत्याने स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही लादलेली शांतता मान्य करणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्रायल-इराण संघर्षात भारताची भूमिका

अलीकडच्या काळात भारताने इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी जवळचे आणि धोरणात्मक संबंध राखले आहेत. इराण-इस्रायल यांच्यातील या संघर्षादरम्यान, भारताने कोणत्याही एका देशाला थेट पाठिंबा दिलेला नाही. तसेच, या प्रकरणी भारताकडून दोन्ही देशांशी कोणताही उघड राजनैतिक संवाद झालेला नाही.