Nobel Peace Prize : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून ते कायम कोणत्या न कोणत्या कारणांवरून चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचं पहायला मिळत आहे. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्यामुळे त्यांनी खंतही बोलून दाखवली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर आता इस्रायलनेही नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शिफारस केली आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सोमवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितलं की, इस्रायलने ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस केली आहे. या संदर्भातील नामांकन पत्र देखील व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत सुपूर्द केल्याचं नेतान्याहू यांनी सांगितलं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
नेतान्याहू म्हणाले की, “नोबेल पुरस्कार समितीला पाठवलेलं पत्र मी या ठिकाणी सादर करू इच्छितो. डोनाल्ड ट्रम्प यांचं नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन योग्य आहे. कारण ट्रम्प नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र आहेत आणि ते त्यांना मिळालं पाहिजे”, असं नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नोबेल शांतता पुरस्कार मिळण्याची इच्छा उघडपणे व्यक्त करणारे ट्रम्प यांनी नेतान्याहू यांच्या या शिफारसीनंतर तुमचे खूप खूप आभार अशा शब्दांत त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
दरम्यान, बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांच्या शांतता आणि सुरक्षिततेच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. यावेळी विशेषतः इराण आणि इस्रायलमधील संघर्षाबाबत ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेचं नेतान्याहू यांनी कौतुक केलं. तसेच ट्रम्प हे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं देखील नेतान्याहू यावेळी म्हणाले आहेत.
पाकिस्ताननेही सुचवलं होतं ट्रम्प यांचं नाव
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. असिम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर लगेचच डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव २०२६ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवलं होतं. विशेष म्हणजे नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांचं नाव सुचवण्यामागचं कारण देखील पाकिस्तानने सांगितलं होतं. भारत-पाकिस्तानमधील संघर्ष रोखण्याचं श्रेय पाकिस्तानने ट्रम्प यांना देत त्या कारणास्तव ट्रम्प यांच्या नावाची शिफारस केल्याचं पाकिस्तानने स्पष्ट केलं होतं.
नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प इतके आग्रही का?
डोनाल्ड ट्रम्प यांचा नोबेल शांतता पुरस्कार मिळविण्याचा हट्ट हा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी संबंधित असू शकतो. २००९ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्याच्या अवघ्या नऊ महिन्यांतच ओबामा यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता. जागतिक राजनैतिक संबंध व लोकांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या त्यांच्या असाधारण प्रयत्नांबद्दल ओबामा यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी अनेकांनी त्यांना हा पुरस्कार देण्यावर आक्षेप घेतला होता. दरम्यान, २०१९ मध्ये ट्रम्प यांनी नोबेल समितीवर टीका करताना म्हटलं की, माझ्या खूप गोष्टींसाठी मला नोबेल पुरस्कार मिळायला हवा होता. जर तो योग्य पद्धतीने दिला गेला असता, तर मला मिळाला असता; पण तसं झालं नाही.