Jain community In Gujarat Bought 186 luxury Cars Together: गुजराती लोकांना देशभरात त्यांच्या व्यापारी वृत्तीसाठी ओळखले जाते. याचबरोबर, त्यांच्या व्यवहारज्ञानाच्या जोरावर ते काही मोठ्या वस्तूंची खरेदी करताना मोठी सूटही मिळवू शकतात. याचेच एक उदाहरण म्हणजे अहमदाबादमधील जैन समाज. त्यांनी जैन आंतरराष्ट्रीय संघटनेच्या पुढाकाराने देशभरातील विविध ठिकाणी १८६ आलिशान कार खरेदी केल्या आहेत. या एकत्रित खरेदीमुळे त्यांना तब्बल २१.२२ कोटी रुपयांची सूट मिळाली आहे. यामध्ये ६० लाख रुपयांपासून ते १.३४ कोटी रुपयांपर्यंतच्या कारचा समावेश आहे.

या खरेदीमध्ये अहमदाबादमधील गुजराती लोकांचा मोठा वाटा आहे. देशभरात सुमारे ६५,००० सदस्य असलेल्या जैन आंतरराष्ट्रीय संघटनेने ऑडी, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज आणि इतर १५ ब्रँडच्या डीलर्सशी संपर्क साधून त्यांच्या सदस्यांसाठी मोठी सूट मिळवण्यासाठी वाटाघाटी केल्या.

“एकत्र खरेदीमुळे आम्हाला अधिक सूट मिळवण्याची संधी मिळते. ब्रँड्सना विक्री होणाऱ्या वस्तूंच्या मोठ्या संख्येमुळे फायदा होतो. तसेच मार्केटिंगचा खर्चही वाचतो, तर आमच्या सदस्यांना मोठी सूट मिळते. या एकत्रित खरेदीत आमच्या संघटनेच्या सदस्यांनी १४९.५४ कोटी रुपयांच्या लक्झरी कार खरेदी केल्या आहेत. यामध्ये त्यांची एकत्रितपणे २१.२२ कोटी रुपयांची बचत झाली आहे” असे जैन आंतरराष्ट्रीय संघटनेचे उपाध्यक्ष हिमांशू शाह यांनी सांगितले. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

या यशाने प्रोत्साहित होऊन, जैन आंतरराष्ट्रीय संघटनेने सामुदायिक खरेदीसाठी एक उपसंघटना स्थापन केली आहे आणि आता अशा खरेदीचा विस्तार इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, दागिने आणि इतर क्षेत्रांमध्ये करणार आहेत.

केवळ जैन लोकच मोठ्या प्रमाणात खरेदी करून सूट मिळवण्याच्या ट्रेंडमध्ये पुढे नाहीत, तर भरवाड समाजानेही या युक्तीचा वापर सुरू केला आहे. भरवाड समाजातील तरुण सदस्यांमध्ये स्वयंरोजगार वाढवण्यासाठी भरवाड युवा संघटना गुजरातने अलीकडेच १२१ जेसीबी मशीनसाठी एकत्र ऑर्डर दिली आणि प्रत्येक मशीनवर सरासरी ३.३ लाख रुपयांची सूट मिळवली. यातून त्यांची सुमारे ४ कोटी रुपयांची बचत झाली आहे.

“यातून आम्ही तरुणांना स्वतःचे उद्योग सुरू करण्यास मदत करतो. ज्यांचे क्रेडिट स्कोअर चांगले नाहीत, त्यांना शून्य डाउन पेमेंटवर जेसीबी मिळाले. त्यांना फक्त पॅन आणि आधार पडताळणीवर ही खरेदी करता आली. यासाठी आमची संघटना परतफेडीची हमी देते”, असे संस्थेचे अध्यक्ष दिलीप भरवाड यांनी सांगितले.