Jaipur School Bullying: जयपूरमधील एका नामांकित खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या विद्यार्थीनीने वर्गातील मुलांचा त्रास असह्य झाल्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ज्यादिवशी विद्यार्थीनीने आत्महत्या केली, त्यादिवशीही वर्गातील मुलांनी तिला त्रास दिला होता. याबद्दल मुलीने दोन वेळा शिक्षकांना याची माहिती दिली, तरीही काहीच कारवाई न झाल्याने मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप पालकांनी केला आहे.
पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्गातील काही मुले त्रास देत असल्याची तक्रार विद्यार्थीनीने किमान चार वेळा शिक्षिकेकडे केली होती. तसेच पालकांनी स्वतःहून हा मुद्दा शाळेकडे उपस्थित केला होता. “काही मुले तिचा सतत अपमान करत होते. तिचे नाव दुसऱ्या मुलाशी जोडून तिची छेड काढायचे. आम्ही याप्रकरणी शिक्षिकेशी संपर्क साधला होता. पण शिक्षिका खूपच असंवेदनशील होती”, अशी माहिती मुलीची आई शिवानी यांनी इंडिया टुडेशी बोलताना दिली.
१ नोव्हेंबर रोजी नऊ वर्षांच्या विद्यार्थीनीने नीरजा मोदी शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. ४८ फूट उंचीवरून खाली पडल्यामुळे मुलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पालकांना मोठा धक्का बसला. ही दुःखद घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. ज्यामध्ये उडी मारण्यापूर्वी विद्यार्थीनी रेलिंगवर चढताना दिसत होती.
आई शिवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या वर्षीही मुलीचा छळ झाला होता. तोच प्रकार यावर्षीही सुरू राहिला. कारण तिच्या वर्गात तेच विद्यार्थी होते. याबाबत मागच्या वर्षीही एक-दोनदा तक्रार दिली होती. तसेच मुख्याध्यापिका इंदू मॅडम यांनाही मुलीबरोबर वर्गात काय घडत आहे, याबद्दलची माहिती दिली होती.
आमच्या समोरच मुलांचे इशारे
विद्यार्थीनीचे वडील विजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांना छळाबद्दल माहिती दिली होती. तरीही छळ सुरूच होता. तसेच आमची मुलगी मुलांबाबत थोडी संकोच बाळगते असा आरोप शिक्षिकेने केला असल्याचेही वडिलांनी सांगितले. “एकदा पालक-शिक्षक बैठकीत आमच्या समोर तिच्या वर्गातला मुलगा काहीतरी इशारा करत असल्याचे आम्ही पाहिले. आम्ही वर्गशिक्षकाशी याबाबत बोललो. तर शिक्षकांनी उत्तर दिले की, अमायरलाही समजायला हवे. या शाळेत मुले आणि मुली एकत्र शिकत आहेत”, अशी माहिती वडिलांनी दिली.
वर्गातील सीसीटीव्हीमध्ये काय दिसले?
मुलीचे काका साहिल यांनी म्हटले की, वर्गातीली सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुढे बसलेली मुले मागे वळून आमच्या मुलीची छेड काढताना स्पष्ट दिसत आहेत. याबद्दल मुलीने शिक्षिकेकडे दोन वेळा तक्रारही दिल्याचे दिसत आहे. तसेच शिक्षिकेनेही तक्रार दिली असल्याचे मान्य केले आहे. तरीही त्यांनी त्यावेळी त्यात हस्तक्षेप केला नाही. तुम्ही मुलांच्या वेदना अशाप्रकारे हाताळता का?
पोलिसांच्या तपासाबाबत पालकांनी असमाधान व्यक्त केले. विजय म्हणाले, पोलिसांकडून फारशी हालचाल होताना दिसत नाही. कारवाईतील विलंब स्पष्ट दिसत आहे. शाळा खूप शक्तीशाली आणि प्रभावशाली आहे. त्यामुळे हे प्रकरण धीम्या गतीने सुरू आहे. नेमके सत्य त्या वर्गालाच माहीत आहे. जर पोलिसांनी वर्गात उपस्थित २० विद्यार्थी आणि शिक्षकाची योग्यरित्या चौकशी केली तर सर्व काही गोष्टी स्पष्ट होतील.
