Jaisalmer Bus Fire राजस्थानातील जैसलमेर येथे आज (१४ ऑक्टोबर) एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसला आग लागली आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस जैसलमेरहून जोधपूरला जात होती. त्याचवेळी बसला आग लागल्याची घटना घडली. या बसमध्ये एकूण ५० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.
या बसमधले १४ प्रवासी गंभीर भाजले आहेत
बसच्या समोरच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्यात यश आलं आहे. पण मागच्या सीटवर बसलेले लोक भाजले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील १४ प्रवासी गंभीररित्या भाजले गेले आहेत आणि त्यापैकी १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं वृत्त ऑल इंडिया रेडिओने दिलं आहे.
बसला आग कशी लागली?
बस जैसलमेरवरुन जोधपूरला येथे जात होती. जेव्हा ही बस वॉर म्युझियमच्याजवळ पोहचली, असताना अचानक बसमधून धूर येऊ लागला आणि काही क्षणात बस जळून खाक झाली. त्यामुळे कोणाला वाचवण्याची संधी मिळाली नाही. आग लागली तेव्हा बसमध्ये ५० प्रवासी बसले होते. आग लागल्यानंतर काही प्रवासी खिडक्या आणि दरवाज्यातून बाहेर आले.परंतू काही प्रवासी अडकले आणि आगीच्या तावडीत सापडले. रस्त्यावरील लोकांनी या अपघाताची तक्रार पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरु झालं.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची पोस्ट काय?
सदर घटनेची माहिती मिळताच राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी पोस्ट लिहून दुःख व्यक्त केलं आहे. या बसच्या दुर्घटनेत ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाबत मी सहवेदना व्यक्त करतो. जे प्रवासी भाजले आहेत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम मिळावा यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो आहे. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.