अमेरिकेबरोबर द्विपक्षीय व्यापारासाठी वाटाघाटी सुरू असताना कोणत्याही संभाषणात ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्याचा मुद्दा उपस्थित झाला नाही असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी लोकसभेत चर्चेदरम्यान स्पष्ट केले. तसेच २२ एप्रिल ते १७ जून या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एकदाही दूरध्वनी संभाषण झाले नाही असेही जयशंकर यांनी सांगितले.

“आपण व्यापार थांबवण्याची धमकी देऊन भारत आणि पाकिस्तान या अण्वस्त्रधारी देशांदरम्यानचा लष्करी संघर्ष थांबवला,” असा दावा ट्रम्प यांनी आतापर्यंत किमान २६ वेळा केला आहे. त्यावरून विरोधकांनी, विशेषतः काँग्रेसने सरकारवर उत्तर देण्यासाठी दबाव वाढवला होता, तसेच पंतप्रधानांनी या मुद्द्यावर मौन बाळगल्याप्रकरणी त्यांना सातत्याने लक्ष्य केले होते. लोकसभेत चर्चेदरम्यान हस्तक्षेप करून परराष्ट्रमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.

जयशंकर यांनी सांगितले की, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दाखवलेल्या मुत्सद्देगिरीमुळे संयुक्त राष्ट्रांच्या १९० सदस्यांपैकी केवळ तीन सदस्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ला विरोध केला. आपल्या देशाच्या स्व-संरक्षणाच्या अधिकाराला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला असे त्यांनी सांगितले. तसेच २६/११च्या हल्ल्यासह भारतातील दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत चीनच्या धोरणाबाबतही त्यांनी भूमिका मांडली. पहलगाम हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दिलेले उत्तर हे ‘न्यू नॉर्मल’ आहे याचा जयशंकर यांनी संसदेत पुनरुच्चार केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ट्रम्प आणि मोदी यांच्यादरम्यान दूरध्वनी संभाषण झाले होते. त्यावेळी ट्रम्प यांनी दहशतवादी हल्ल्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. त्यानंतर १७ जूनला त्यांनी मोदी यांना फोन करून कॅनडामध्ये भेट होऊ शकत नाही असे कळवले होते. – एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री