S. Jaishankar On Pakistan And Terrorism: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी दहशतवादी कारवायांमधील भूमिका सातत्याने नाकारणाऱ्या पाकिस्तानला चांगलेच फटकारले आहे. नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान त्यांनी डच दैनिक डी वोल्क्सक्रांतला सांगितले की, “दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तान आणि त्यांचे सैन्य सहभागी आहे.”

युरोपियन युनियनमधील भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असलेल्या नेदरलँड्सशी आर्थिक आणि धोरणात्मक संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने राजनैतिक दौऱ्यावर असताना, जयशंकर यांनी दहशतवादी कारवायांमधील पाकिस्तानच्या सहभागावर भारताची भूमिका स्पष्ट केली.

एस. जयशंकर यांनी डिसेंबर २०२२ मध्ये पाकिस्तान “दहशतवादाचे केंद्र” असल्याचे म्हटले होते. याबद्दल विचारले असता, ते म्हणाले, “मी ते सुचवत नव्हतो, ते सांगत आहे. समजा अ‍ॅमस्टरडॅमच्या (नेदरलँड्सची राजधानी) मध्यभागी लष्करी केंद्रे असतील आणि तिथे हजारो लोक लष्करी प्रशिक्षणासाठी जमतात. तेव्हा तुमच्या सरकारला त्याबद्दल काहीच माहिती नाही असे तुम्ही म्हणाल का?”

“पाकिस्तानला त्यांच्या देशात काय चालले आहे हे माहित नाही, असे आपण समजू नये. संयुक्त राष्ट्रांच्या यादीतील सर्वात कुख्यात दहशतवादी पाकिस्तानात आहेत. ते मोठ्या मोठ्या शहरांमध्ये दिवसाढवळ्या फिरतात. त्यांचे पत्ते माहीत आहेत, त्यांच्या कारवाया माहीत आहेत आणि त्यांच्यातील परस्पर संबंधही माहीत आहेत. म्हणून आपण दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानचा सहभाग नसल्याचे समजू नये. यामध्ये त्यांच्या सरकारसह सैन्याचाही हात आहे”, असेही जयशंकर म्हणाले.

परराष्ट्रमंत्र्यांनी पुढे सांगितले की, “पहलगाम हल्लाही त्यांनीच घडवून आणला आहे. त्यांनी स्वतःच्या अत्यंत मर्यादित आणि स्वार्थी हेतूंसाठी काश्मीरमधील गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जाणूनबुजून या हल्ल्याला धार्मिक रंग दिला. त्यामुळे जगाने अशा गोष्टी स्वीकारू नयेत.”

जयशंकर यांनी यावेळी दहशतवाद आणि काश्मीर प्रश्न एकत्र करण्याचे प्रयत्न फेटाळून लावले. त्यांनी दहशतवादाला समर्थन करता येणार नाही असा “आंतरराष्ट्रीय गुन्हा” म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील

जयशंकर यांनी यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १२ मे रोजी झालेल्या शस्त्रविरामात मध्यस्थी केल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला. त्यांनी पाकिस्तानला इशारा देत पुढे म्हटले की, “आमचा संदेश स्पष्ट आहे की ‘हो, शस्त्रविरामामुळे सध्या लष्करी कारवाया थांबल्या आहेत. पण जर पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ले सुरू राहिले तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.”