Kiren Rijiju Reaction On Jasprit Bumrah Jet Crash Celebration: आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत नवव्यांदा विजेतेपद पटकावले. या सामन्यातील भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे ‘जेट क्रॅश’ सेलिब्रेशन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. पाकिस्तानच्या हरिस रौफला बोल्ड केल्यानंतर बुमराहने हे ‘जेट क्रॅश’ सेलिब्रेशन केले.
दरम्यान, या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या दोन्ही सामन्यांत हरिस रौफने भारतीय चाहत्यांकडे पाहत चिथावणीखोर ‘जेट क्रॅश’ सेलिब्रेशन केले होते. यातून ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय लष्कराची सहा विमाने पाडल्याच्या पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांना रेटण्याचा रौफने प्रयत्न केला होता. पण काल बुमराहने त्याला बोल्ड करत त्याच्याच भाषेत उत्तर दिले.
पाकिस्तानला ही शिक्षा…
या सामन्यातील विजयानंतर भारतीय संघाला शुभेच्छा देताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बुमराहच्या ‘जेट क्रॅश’ सेलिब्रेशनचाही फोटो शेअर केला आणि म्हटले, “पाकिस्तानला ही शिक्षा गरजेची होती.”
‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये रिजिजू म्हणाले की, “भारतीय संघाचे अभिनंदन. पाकिस्तानला पराभूत करायचेच होते. भारत कायम चॅम्पियनच राहील. पाकिस्तानला ही शिक्षा मिळणे गरजेचे होते.”
पाकिस्तानच्या डावाच्या १८ व्या षटकातील घटना
या सामन्यात पाकिस्तान संघाची फलंदाजी पहिल्यांदा होती. त्यांच्या डावाच्या १८ व्या षटकात जसप्रीत बुमराहने हारिस रौफला बोल्ड केले. यानंतर बुमराहने ‘जे क्रॅश’ केल्याचे सेलिब्रेशन केले आणि मग एक हारिसकडे एक कटाक्ष हारिसकडे टाकला. यानंतर सोशल मीडियावर बुमराहच्या या सिलिब्रेशनचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. या स्पर्धेत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये हारिस रौफने चिथावणीखोर ‘जेट क्रॅश’ सेलिब्रेशन केले होते. यामुळे त्याला आयसीसीने दंडही ठोठावला आहे.
आशिया चषक ठरला वादग्रस्त
दरम्यान, यंदाची आशिया चषक स्पर्धा सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ही स्पर्धा सुरुवातीला पाकिस्तानमध्ये होणार होती. पण पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानला जायचे नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे स्पर्धेचे ठिकाण पाकिस्तानहून युएईला हलवण्यात आले. याचबरोबर भारतीय संघाने या संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला. कालच्या अंतिम सामन्यापूर्वी या स्पर्धेत दोन वेळा भारत-पाकिस्तान सामना झाला. या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंनी ऑपरेशन सिंदूरबाबत चिथावणीखोर हावभाव केले होते.