Jaya Bachchan Angry at Jagdeep Dhankhar : ज्येष्ठ अभिनेत्री व समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांचं राज्यसभेत नाव पुकारत असताना तालिका सभापतींनी ‘जया अमिताभ बच्चन’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर जया बच्चन यांनी तालिका सभापतींवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आठवडाभराने पुन्हा एकदा तशीच घटना सभागृहात घडली आहे. मात्र यावेळी जया बच्चन यांचा सामना थेट उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याशी झाला. त्यानंतर धनखड यांनी जया बच्चन यांना चांगलंच सुनावलं. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आज (५ ऑगस्ट) सभागृहात जया अमिताभ बच्चन असं नाव पुकारलं. त्यानंतर खासदार जया बच्चन उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, “तुम्हाला अमिताभचा अर्थ माहिती आहे का?” त्यानंतर सभापती म्हणाले, “मी काही हे ठरवून केलं नाही. मी केवळ तुमच्या प्रतिज्ञापत्रावरील नाव वाचलं. शिवाय अमिताभ बच्चन यांना संपूर्ण देश ओळखतो, सर्वजण त्यांचा सन्मान करतात.” तरीदेखील जया बच्चन मागे हटायचं नाव घेत नव्हत्या. अखेर सभापतींनी सुनावल्यानंतर त्या शांत झाल्या.

सभापतींनी जया अमिताभ बच्चन असं नाव पुकारल्यानंतर जया बच्चन संतापल्या आणि म्हणाल्या, “सर तुम्हाला अमिताभचा अर्थ माहिती आहे का? मला माझ्या पतीचा आणि त्यांनी केलेल्या कामांबद्दल अभिमान आहे. मला माझ्या नावाचाही अभिमान आहे. माझ्या पतीचं नाव, त्यांनी आयुष्यभरात जे काही कमावलं आहे त्यावर गर्व आहे. परंतु, तुम्हाला अमिताभचा अर्थ माहिती आहे का? आभा, जी कधी पुसली जाऊ शकत नाही. मला एक कळत नाही, तुम्ही लोकांनी हे काय नवीनच नाटक सुरू केलंय. असं पूर्वी होत नव्हतं.”

…तुम्ही तुमचं नाव बदलून घ्या : जगदीप धनखड

यावर जगदीप धनखड यांनी देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “निवडणूक आयोगाकडे तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर जे नाव लिहिलं होतं तेच नाव मी पुकारलं आहे आणि तीच पद्धत आहे. एखाद्या सदस्याला त्याचं नाव बदलायचं असेल तर त्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. मी स्वतः त्या प्रक्रियेद्वारे १९८९ साली माझं नाव बदललं होतं. सभागृहातील सर्व सदस्यांसाठी ती प्रक्रिया उपलब्ध आहे. तुम्ही तुमचं नाव बदलून घ्या. मी देखील माझ्या यादीत तुमचं नाव बदलून घेतो.”

सभापतींनी सांगितला फ्रान्समधील किस्सा

त्यानंतर सभापतींनी त्यांचा फ्रान्स दौऱ्यातील एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, मी एकदा फ्रान्सला गेलो होते. तिथल्या हॉटेलच्या गॅलरीत जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो लावले होते. तिथे मला अमिताभ बच्चन यांचा फोटो देखील पाहायला मिळाला. मला अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अभिमान वाटतो, संपूर्ण देशालाच त्यांच्याबद्दल अभिमान आहे.

हे ही वाचा >> Bangladesh PM Sheikh Hasina Resigns: बांगलादेश अस्थिरतेच्या वाटेवर? शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर लष्करप्रमुखांनी जनतेशी साधला संवाद, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खट्टर यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख का केला नाही? जया बच्चन यांचा प्रश्न

सभापती व खासदार बच्चन यांच्यातील वाद मिटला नाही. सभापतींनी मंत्री मनोहरलाल खट्टर यांचं नाव पुकारल्यानंतर जया बच्चन यांनी त्यावर आक्षेप घेतला. खासदार बच्चन म्हणाल्या, “तुम्ही यांच्या पत्नीचं नाव का पुकारलं नाही? तुम्ही त्यांच्या पत्नीच्या नावाचाही उल्लेख करायला हवा होता.” त्यावर मनोहरलाल खट्टर म्हणाले, “मला त्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागेल.”