नवी दिल्ली : भाजपविरोधातील ‘इंडिया’ महाआघाडी कमकुवत होत असतानाच विरोधी नेत्यांभोवतीचा सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) फास अधिकाधिक आवळला जाऊ लागला आहे. जमीन घोटाळा प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘ईडी’ने सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सोमवारी छापा टाकून दोन बीएमडब्ल्यू कार, काही कागदपत्रे आणि ३६ लाख रुपये रोख जप्त केले. सोरेन घरी नसल्यामुळे अधिकाऱ्यांनी १३ तास बाहेर तळ ठोकला होता. झारखंडमधील माफियांकडून जमिनी मिळवण्याच्या कथित घोटाळयाप्रकरणी ‘ईडी’ने सोरेन यांना तब्बल नऊ वेळा समन्स बजावले होते. याप्रकरणी ‘ईडी’ने आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे. सोरन यांच्या विरोधात पुरावे असल्याचा ‘ईडी’चा दावा  आहे.

हेही वाचा >>> हिवाळी अधिवेशनातील निलंबित खासदारांचं निलंबन होणार रद्द, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

सोरेन दोन दिवसांपूर्वी खासगी विमानाने रांचीतून दिल्लीत दाखल झाले होते. हे विमान दिल्ली विमानतळावरच होते. मात्र मंगळवारी सोरेन बेपत्ता झाले होते. दिल्लीतील निवासस्थानी ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना सोरेन सापडले नाहीत. दुपापर्यंत त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यांच्या मदतनीसांचे फोनही बंद होते. सोरेन यांनी रविवारी रात्री उशिरा दिल्लीतील निवासस्थान सोडल्याचा ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांचा कयास होता. सोमवारी दिवसभर ते नेमके कोठे होते याची माहिती कोणालाही नाही. मात्र, सोरेन यांनी ‘ईडी’ला पत्र पाठवून बुधवारी दुपारी एक वाजता चौकशीसाठी हजर राहात असल्याचे कळवले होते.

‘लालू-राबडीदेवी’ फॉम्र्युला?

सोरेन यांनी मंगळवारी रांचीमध्ये पोहोचत झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीला सोरेन यांच्या पत्नी कल्पनादेखील उपस्थित होत्या. त्यामुळे सोरेन यांना अटक झालीच तर कल्पना यांना मुख्यमंत्री केले जाण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. बिहारमध्ये चारा घोटाळयात अटक होण्याआधी लालूप्रसाद यादव यमंनी पत्नी राबडीदेवी यांना अशाच पद्धतीने मुख्यमंत्री बनविले होते.

तेजस्वी यादवांची चौकशी

राष्ट्रीय जनता दलाचे नेते व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची नोकरीसाठी जमीन हस्तांतरण प्रकरणात ‘ईडी’ने मंगळवारी चौकशी केली. याप्रकरणी सोमवारी लालूप्रसाद यादव यांची १० तास चौकशी झाली होती. २००४-०९ या काळात ‘यूपीए-१’ सरकारमध्ये लालूप्रसाद रेल्वेमंत्री असताना कथितरीत्या हा घोटाळा झाला होता. याप्रकरणी राबडीदेवी व मुलगी मिसा यांचीही चौकशी झाली आहे.

चौकशीच्या फेऱ्यातील ‘इंडिया’चे नेते

* मद्य घोटाळा – मनीष सिसोदिया, संजय सिंह, अरविंद केजरीवाल (आम आदमी पक्ष)

* रोजगार घोटाळा – अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस)

* हेराल्ड प्रकरण – राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे (काँग्रेस)

* जमीन घोटाळा – भूपेंदर हुडा (काँग्रेस)

* राज्य सहकारी बँक आर्थिक घोटाळा – रोहित पवार (राष्ट्रवादी-शरद पवार गट)

* करोनाकाळातील आर्थिक घोटाळा: किशोरी पेडणेकर शिवसेना- ठाकरे गट

* जमीन घोटाळा- रवींद्र वायकर शिवसेना- ठाकरे गट

* रिसॉर्ट जमीन घोटाळा- अनिल परब शिवसेना- ठाकरे गट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* आर्थिक गैरव्यवहार – खासदार संजय राऊत, बंधू संदीप राऊत  (शिवसेना- ठाकरे गट)