गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. यासंदर्भात आता झारखंड काँग्रेसच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर कारवाई करण्यात आली आहे. अमित शाह यांचा डीपफेक व्हिडीओ शेअर केला म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच, यासंदर्भात काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. यासंदर्भात आता काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

झारखंड काँग्रेसच्या एक्स अकाऊंटवर “Account Withheld” असा संदेश येत आहे. त्याचबरोबर कायदेशीर कारवाई म्हणून हे अकाऊंट बंद करण्यात आल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत विरोधी पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवर कारवाई करण्यात आल्यामुळे त्यावरून राजकीय टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. झारखंड काँग्रेसकडूनही या कारवाईचा निषेध करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

झारखंड काँग्रेसच्या एक्स अकाऊंटवरून अमित शाह यांचा व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. यासंदर्भात कायदेशीर कारवाईची मागणी झाल्यानंतर त्यानुसार पोलिसांनी कारवाईही सुरू केली आहे. मात्र, हा डीपफेक व्हिडीओ शेअर केल्यामुळे भाजपाकडून झारखंड काँग्रेसच्या एक्स अकाऊंटवरील मजकुराबाबत आक्षेप नोंदवण्यात आला होता. त्यानुसार हे अकाऊंट बंद करण्यात आल्याची माहिती एक्सकडून देण्यात आली आहे.

“पंतप्रधानांनी निर्लज्ज मौन…”, ‘त्या’ प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल; प्रियांका गांधींचीही संतप्त टीका!

दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल

दरम्यान, अमित शाह यांच्या डीपफेक व्हिडीओप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरनं यासंदर्भात तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात झारखंड काँग्रेस प्रमुख राजेश ठाकूर यांना दिल्ली पोलिसांनी नोटीसही बजावली आहे. मात्र, नोटीस का बजावली आहे, हेच कळत नसल्याचं राजेश ठाकूर म्हणाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला नोटीस मिळाली आहे. पण मला नोटीस का बजावली हेच मला कळत नाहीये. ही सरळ सरळ हुकुमशाही आहे. जर यासंदर्भात काही तक्रार दाखल झाली असेल, तर मग आधी त्यांनी माझं एक्स अकाऊंट तपासायला हवं. निवडणूक प्रचार सुरू असताना प्रचारात माझा सहभाग साहजिक आहे. अशा स्थितीत त्यांनी माझा लॅपटॉप आणि इतर सर्व गॅजेट्सची मागणी केली आहे”, असं राजेश ठाकूर म्हणाले.