जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथील माछिल सेक्टरमध्ये मंगळवारी दहशतवादी हल्ल्यात तीन भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारतीय सैन्याने सीमेवर पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारतीय सैन्याने आज सकाळपासून पुंछ आणि राजौरी सेक्टरमधील पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. तत्पूर्वी पाकिस्तानने बुधवारी पुन्हा एकदा भिंबर गली, कृष्णा घाटी आणि नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानकडून काल माछिलमध्ये करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यादरम्यान भारतीय सैनिकाच्या मृतदेहाची विटंबनाही करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय सैन्याने पाकच्या या भ्याड कृतीला चोख उत्तर देण्याचे ठरवले आहे. तत्पूर्वी मंगळवारी  बांदीपुरा येथे चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या दहशतवाद्यांकडून दोन हजार रुपयांच्या नवीन नोटाही जप्त करण्यात आल्या होत्या. तर बीएसएफच्या जवानांनी आरएसपुरा सेक्टरमध्ये एका पाकिस्तानी घुसखोराला टिपले होते. या दोन्ही घटना ताज्या असतानाच माछिल सेक्टरमध्येही दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. सोमवारी राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. या घटनेत सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल राय सिंह हे शहीद झाले होते. तर चार जवान या घटनेत जखमी झाले होते.

उरीमध्ये पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी लष्करी छावणीवर हल्ला केला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी  भारताने २९ सप्टेंबररोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले होते. या हल्ल्यात भारताच्या जवानांनी दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले होते. मात्र भारताच्या सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. सीमा रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबाराच्या २८६ घटना घडल्या आहेत. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आत्तापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून यात १४ जवानांचा समावेश आहे. सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानवर वचक निर्माण होईल अशी आशा होती. पण त्यानंतरही पाकिस्तानच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे पाकविरोधात मोदी सरकारचे धोरण फसल्याची टीका विरोधक करत आहेत. भारतावर दबाव टाकण्यासाठी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात सीमारेषेजवळ पाकिस्तानच्या सैन्याने युद्धाचा सरावदेखील केला होता. भारताला सडेतोड उत्तर देऊ अशी धमकीही पाकिस्तानकडून वारंवार दिली जात होती.