देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थितीत अजूनही फारशी सुधारणा झाली नसल्याचं दिसत आहे. लॉकडाउन टप्प्याटप्प्यानं शिथिल होत असताना दुसरीकडे करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढत आहे. मागील काही दिवसात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसाला ५० हजारांच्या सरासरीनं वाढत असल्याचं दिसून येत आहे. या प्रचंड रुग्णवाढीमुळे देशातील रुग्णसंख्या १५ लाखांवरून २० लाख होण्यासाठी केवळ नऊ लागले आहेत.

देशात मागील २४ तासात आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णसंख्येची नोंद झाली. देशात पहिल्यांदाच ६२ हजार करोनाबाधित रुग्ण आढळून आले. या वाढीबरोबरच देशातील एकूण रुग्णसंख्या २० लाख २७ हजार ७५ इतकी झाली आहे. लक्षणीय बाब म्हणजे १५ लाखांवरून २० लाख रुग्णसंख्या होण्यासाठी फक्त नऊ दिवसांचा कालावधी लागला आहे. देशात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर एक लाख रुग्णसंख्या होण्यासाठी तब्बल ७८ दिवसांचा कालावधी लागला होता. १८ मे रोजी देशातील रुग्णसंख्या १ लाखांवर पोहोचली होती.

त्यानंतर रुग्णसंख्या वाढीचा वेग वाढल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. एक लाखावरून पाच लाख रुग्णसंख्या होण्यासाठी ३९ दिवसांचा कालावधी लागला. १८ मे ते २६ जून या काळात देशात तब्बल चार लाख रुग्णांची भर पडली. १६ जुलै रोजी देशातील रुग्णसंख्या १० लाखांवर पोहोचली. ५ लाखांवरून १० लाख रुग्णसंख्या होण्यासाठी फक्त २० दिवस लागले. विशेष म्हणजे लॉकडाउन शिथिल करण्याच्या निर्णयानंतर ही वाढ झाली आहे.

१६ जुलैपासून देशातील रुग्णवाढीची कालमर्यादा कमी होत गेल्याचं दिसून आलं. १० लाखांवरून १५ लाख रुग्णसंख्या होण्यासाठी १२ दिवस लागले. या काळात देशात दिवसाला ४५ हजार ते ५५ हजार या सरासरीनं रुग्ण आढळून आले. तर ६ ऑगस्ट रोजी देशातील रुग्णसंख्येनं २० लाखांचा टप्पा पार केला. १५ लाखांवरून २० लाख रुग्णसंख्या होण्यासाठी केवळ नऊ दिवसांचाच कालावधी लागला आहे. चिंतेची बाब म्हणजे या काळात भारत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णसंख्येत जगात पाचव्या स्थानी गेला. भारतानं इटलीलाही मागे टाकलं.