Madhya Pradesh High Court Judge: मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठातून न्यायमूर्ती डी.वी. रमण हे मंगळवारी निवृत्त झाले. यावेळी त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी त्यांच्या कार्यकाळत त्यांना आलेले काही अनुभव सांगितले आहेत. तसेच डी.वी. रमण यांनी त्यांच्या कार्यकाळातील बदलीबाबतची एक खंतही बोलून दाखवली आहे. तसेच कोणत्याही ठोस कारणाशिवाय माझी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयातून मध्य प्रदेश उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती, असं म्हटलं. तसेच देव इतक्या सहज विसरतही नाही आणि माफही करत नाही, असं सूचक भाष्य निवृत्तीच्या भाषणात करत डी.वी.रमण यांनी बदलीबाबतची खंत बोलून दाखवली आहे.

डी.वी.रमण यांनी काय म्हटलं?

“माझी कोणत्याही कारणाशिवाय आंध्र प्रदेश उच्च न्यायालयातून मध्य प्रदेश उच्च न्यायालयात बदली करण्यात आली. तसेच मला पर्याय विचारण्यात आले. माझ्या पत्नीला चांगले उपचार मिळावेत म्हणून मी कर्नाटक राज्य निवडलं होतं. मात्र, माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याचा विचार केला नाही. मी १ नोव्हेंबर २०२३ रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर मी माझ्या पत्नीच्या वैद्यकीय उपचारांच्या कारणावरून १९ जुलै २०२४ आणि २८ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाला निवेदन देखील पाठवलं होतं. मात्र, त्या निवेदनाचा विचार करण्यात आला नाही किंवा ते निवेदन नाकारण्यातही आलं नाही”, असं डी.वी.रमण यांनी म्हटलं.

“तत्कालीन सरन्यायाधीशांच्या कार्यकाळात मी दुसरं निवेदन पाठवलं होतं. तेही निवेदन नाकारलं गेलं नाही किंवा विचारातही घेतलं गेलं नाही. मला त्यावर काहीच उत्तर मिळालं नाही. माझ्यासारख्या न्यायाधीशांना सकारात्मक निर्णयाच्या विचारांची अपेक्षा असते. पण तेव्हा मी निराश आणि खूप दुःखी झालो होतो. आता सध्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यावर विचार करू शकतात, पण आता खूप उशीर झाला आहे”, असं म्हणत डी.वी.रमण यांनी खंत व्यक्त केली. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

“असं असलं तरी माझ्या बदलीचा आदेश चुकीच्या हेतूने आणि मला त्रास देण्यासाठी जारी करण्यात आला होता, असं मला वाटलं. माझ्या मूळ राज्यातून स्पष्ट कारणांशिवाय माझी बदली करण्यात आली. पण तरीही त्यांचा अहंकार पूर्ण करण्यात मी आनंद मानला. आता ते सरन्यायाधीश निवृत्त झाले आहेत. पण देव कधी क्षमा करत नाही आणि विसरतही नाही. त्यांना दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या मार्गांने त्रास सहन करावा लागेल. प्रत्येकासाठी एक पद कायम राहत नाही. पण माझ्या नशिबाने हे संकट माझ्यासाठी वरदानात बदललं,” असंही डी.वी.रमण यांनी म्हटलं.

दरम्यान, रमण यांनी असंही सांगितलं की त्यांना जबलपूर आणि इंदूरच्या न्यायाधीशांकडून आणि बारच्या सदस्यांकडून प्रचंड प्रेम, पाठिंबा आणि सहकार्य मिळालं. तसेच मी आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये कायमस्वरूपी योगदान दिलं. मला अमरावती, कृष्णा, गोदावरी आणि नर्मदेच्या भूमीत सेवा करण्याची संधी मिळाली. मी खरोखर न्यायाची सेवा केली, या संधींसाठी मी धन्य झालो”, असंही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डी.वी.रमण यांनी असंही म्हटलं की, “दैनंदिन अनुभवांमधून मी माझ्या आयुष्यात अनेक आव्हानांना तोंड दिलं. मला हे जाणवलं की कठोर परिश्रमाशिवाय यशाचा कोणताही शॉर्टकट नाही. माझ्या कारकिर्दीतील संघर्ष आणि कटू अनुभवांच्या प्रवासाने मला माझ्या कार्यात विविधता आणण्यास मदत केली. मी न्यायाच्या सेवेत रुजू झालो त्या दिवसापासून न्यायव्यवस्थेत या पदावर पोहोचेपर्यंत मला अनेक संकटाचा सामना करावा लागला. मी आणि माझ्या कुटुंबाने शांतपणे सहन केलं आणि शेवटी सत्य नेहमीच विजयी होतं”, असंही ते म्हणाले.