नवी दिल्ली :न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांची बुधवारी देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते देशाचे ४९ वे सरन्यायाधीश आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लळित यांच्या नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी केली. २७ ऑगस्ट रोजी न्या. लळित यांचा शपथविधी होणार आहे.

सध्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट रोजी समाप्त होत असल्याने दुसऱ्या दिवशी न्या. लळित कार्यभार स्वीकारतील. केवळ तीन महिने न्या. लळित या पदावर असतील. ८ नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. न्या. लळित हे दुसरे सरन्यायाधीश असतील, ज्यांना वकिलांमधून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात स्थान देण्यात आले. १९७१मध्ये एस. एम. सिक्री यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली, जे मार्च १९६४मध्ये थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात नियुक्त झालेले पहिले वकील होते.

लळित यांच्याविषयी..

९ नोव्हेंबर १९५७ रोजी न्या. यू. यू. लळित यांचा जन्म झाला. त्यांचे पिता यू. आर. लळित हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अतिरिक्त न्यायाधीश होते. न्या. लळित यांनी मुंबई उच्च न्यायालयात जून १९८३ मध्ये वकिलीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी १९८६पासून दिल्ली न्यायालयात वकिली केली. एप्रिल २००४ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त झाले. १३ ऑगस्ट २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील अनेक ऐतिहासिक निकालांचा ते भाग होते. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ऑगस्ट २०१७ मध्ये ३-२ अशा बहुमताने ‘तिहेरी तलाक’ घटनाबाह्य असल्याचा निकाल दिला होता. या तीन न्यायाधीशांमध्ये न्या. लळित यांचाही समावेश होता.