Jyoti Malhotra पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात ज्या सहा जणांना अटक झाली आहे त्यात ज्योती मल्होत्रा ही युट्यूबरही आहे. ट्रॅव्हल विथ जो नावाचं युट्यूब चॅनल चालवणारी ही युट्यूबर आहे. दरम्यान आता तिच्या एका व्हिडीओत तिने पाकिस्तानसाठी हेर म्हणून काम केल्याचा पुरावा मिळाला आहे.

कशा प्रकारे पाकिस्तानच्या संपर्कात होती ज्योती?

ज्योती मल्होत्रा व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पाकिस्तानी ऑपरेटिव्ह शाकिर ऊर्फ राणा शाहबाजच्या संपर्कात होती. याचा फोन नंबर तिने जट रंधवा या नावाने सेव्ह केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानबद्दल सकारात्मक चित्र निर्माण करण्याचे काम पाकिस्तानी हँडलर्सकडून ज्योतीला देण्यात आले होते, अशी माहितीही समोर आली आहे. ज्योती मल्होत्रावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ आणि ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट, १९२३ च्या कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्योतीचा लेखी जबाब घेतल्यानंतर हे प्रकरण हिसारच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले आहे. दरम्यान आता तिच्या चौकशीत तिच्याच व्हिडीओत एक मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.

ज्योती मल्होत्राच्या व्हिडीओत काय समोर आलं?

ट्रॅव्हल विथ जो या नावाने ती कर असलेल्या विविध व्हिडीओंची तपासणी करण्यात आली. त्यातल्या एका व्हिडीओत ज्योती मल्होत्रा पाकिस्तानचे उच्च अधिकारी एहसान उर रहीम अलियास दानिश यांच्यासह दिसते आहे. तिच्या विरोधातला हा मोठा पुरावा तिच्याच व्हिडीओंमध्ये मिळाला आहे. ज्योतीने रहीम यांच्या पत्नीचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय लष्कराबाबतची गोपनीय माहिती तिने पाकिस्तानला पुरवली आहे. ज्योती आणि रहीम यांच्या पत्नीच्या भेटीगाठी अनेकदा झाल्याचं त्या व्हिडीओंतून स्पष्ट कळतं आहे. १७ मे २०२५ ला ज्योतीला अटक करण्यात आली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

Jyoti Malhotra met Pakistan High Commission official Ehsan-ur-Rahim alias Danish.
ज्योती मल्होत्राने पाकिस्तानच्या उच्चाधिकाऱ्याची भेट घेतल्याचा व्हिडीओ समोर (फोटो-एक्स पेज)

ज्योतीने केला होता इंडोनेशिया आणि बालीचाही दौरा

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कमिशन एजंट्सच्या माध्यमातून व्हिसा मिळाल्यानंतर ज्योतीने २०२३ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यावेळी ती रहीमच्या संपर्कात आली. रहीम तेव्हा दिल्लीमधल्या पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयात अधिकारी होता. ज्योतीने काही दिवसांपूर्वीच एका पाकिस्तानी अधिकाऱ्यासह इंडोनेशिया आणि बाली या ठिकाणांचाही दौरा केला होता. सोशल मीडियावर पाकिस्तान सकारात्मक दिसला पाहिजे म्हणून तिला पैसे दिले जात होते. तसंच भारताबाबतची माहिती पुरवण्याचेही पैसे तिला मिळत होते.