हिंदूंसाठी पवित्र तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेला उत्तराखंड विधानसभेचे सभापती गोविंद सिंग कुंजवाल व आमदार मनोज तिवारी यांनी शनिवारी हिरवा झेंडा दाखवला.
कुमाऊ मंडल विकास निगमचे व्यवस्थापकीय संचालक धीरज गारबियाल यांनी सांगितले, की ५८ भाविकांची पहिली तुकडी रवाना झाली असून त्यात ११ महिला आहेत. त्यात केरळचा श्रीनाथ हा सर्वात लहान असून, तो २१ वर्षांचा आहे. सत्तर वर्षांचे मधू पटेलही यात्रेत सहभागी आहेत. उत्तराखंडचे आमदार सुरेंद्र जीना पहिल्या तुकडीबरोबर कैलास मानसरोवरची यात्रा करीत आहेत, असे गरबियाल यांनी सांगितले.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी काल दिल्ली येथून या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला नंतर ही तुकडी धारचुला बेस कॅम्पला आली. आता यात्रेकरू २० जूनपर्यंत चीनच्या तिबेट स्वायत्त भागात पोहोचतील. त्यासाठी त्यांना लिपुलेख खिंडीतून १७,५०० फूट उंचीवर जावे लागणार आहेत. एकूण १८ तुकडय़ा जाणार असून त्यात प्रत्येकी ६० जणांचा समावेश असेल. जुन्या मार्गानेच ते जाणार आहेत तर नाथुला मार्गाने समुद्रसपाटीपासून ४००० मीटर उंचीवरून पाच तुकडय़ा जाणार असून त्यात प्रत्येकी ५० भाविक असतील. वयस्कर लोकांसाठी नाथुलाचा मार्ग सोपा आहे. हा दुसरा मार्ग सिक्कीममधून जाणारा आहे व त्यासाठीचे सोपस्कार १ फेब्रुवारीला सुषमा स्वराज चीनमध्ये गेल्या होत्या, तेव्हा पूर्ण करण्यात आले होते.