मागील अनेक दिवसांपासून काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या पूर्णवेळ अध्यक्षाच्या नियुक्तीपासून पक्षांतर्गत बदलांची मागणी करत वेगळी भूमिका घेतली होती. यात माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांचाही समावेश होता. मात्र, आता कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षातील बदलांचा आग्रह सोडत वेगळा मार्ग चोखाळला आहे. कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यांनी समाजवादी पार्टीच्या पाठिंब्यावर राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे.

समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरताना कपिल सिब्बल यांच्यासोबत सपाचे प्रमुख अखिलेश यादव देखील होते. यावेळी सिब्बल यांनी सांगितलं की त्यांनी १६ मे रोजीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. सपाकडील आमदारांचं संख्याबळ पाहता कपिल सिब्बल राज्यसभेत निवडून जाणं निश्चित आहे.

“राज्यसभेसाठी आणखी दोन नावांचीही लवकरच घोषणा”

कपिल सिब्बल यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरल्यानंतर अखिलेश यादव म्हणाले, “समाजवादी पक्षाकडून ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यात आला आहे. ते सपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जातील. राज्यसभेसाठी आणखी दोन नावांचीही लवकरच घोषणा होईल.”

हेही वाचा : “..पक्ष डोळे मिटून पुढे जातो”, सुष्मिता देव यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कपिल सिब्बल पक्षनेतृत्वावर भडकले!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मोदी सरकारविरोधात आघाडी तयार करू इच्छितो”

राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कपिल सिब्बल म्हणाले, “मी १६ मे रोजीच काँग्रेस पक्ष सोडला. मला वाटतं जेव्हा एका अपक्ष उमेदवाराचा आवाज येईल तेव्हा लोकांना हा उमेदवार कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही असं वाटले. आम्ही विरोधी पक्षात राहून मोदी सरकारविरोधात आघाडी तयार करू इच्छितो. २०२४ मध्ये असं वातावरण बनावं की मोदी सरकारच्या सर्व चुका लोकांपर्यंत पोहचतील. मी यासाठी प्रयत्न करेल.”