कर्नाटक विधानसभा त्रिशंकु होईल अशी शक्यता बहुतांश निवडणूकपूर्व चाचणीत वर्तवण्यात आली आहे. भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी.एस.येदियुरप्पा यांनी मात्र हे सर्व अंदाज फेटाळत आपणच राज्याचे ‘किंग’ बनू असा दावा केला आहे. भाजपा सत्तेवर येण्याचा येदियुरप्पांना इतका आत्मविश्वास आहे की त्यांनी आपल्या शपथविधीची तारीखही जाहीर करून टाकली आहे. दि. १८ मे रोजी आपण मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे म्हटले आहे. येदियुरप्पांच्या आत्मविश्वासाची कर्नाटकमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.

आज तक या वृत्त वाहिनीशी बोलताना येदियुरप्पा यांनी कोणत्याही परिस्थिती कर्नाटकात भाजपाचीच सत्ता येणार असल्याचे म्हटले. कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री मीच आहे. हे १०१ टक्के निश्चित असून येत्या १८ मे रोजी मी पदाची शपथही घेणार आहे. आम्हाला आवश्यक इतक्या जागा मिळतील. मी पंतप्रधानांना यासाठी बेंगळुरूतच राहण्याची विनंतीही केली असल्याचे येदियुरप्पा यांनी सांगितले. त्याचबरोबर विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा चांमुडेश्वरी मतदारसंघात दणदणीत पराभव होईल, अशी भविष्यवाणीही केली.

उत्तर प्रदेशमध्ये जे झाले ते कर्नाटकमध्येही होईल, हे शक्य नाही. इथे त्रिशंकु विधानसभा अस्तित्वात येणार नाही. आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल आणि पुढचे सरकार आम्हीच बनवू असे त्यांनी म्हटले.

लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा मुद्दा माझ्या मुख्यमंत्री बनण्यात अडथळा निर्माण करणार नाही, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. येदियुरप्पा हे स्वत: लिंगायत समाजातून येतात आणि भाजपाचा स्वतंत्र लिंगायत धर्मास विरोध आहे. यामुळे कर्नाटकमध्ये सध्या लिंगायत समाजात दोन गट पडले आहेत. परंतु, त्याचा आपल्याला फटका बसणार नसल्याचे येदियुरप्पा यांनी म्हटले. दरम्यान, सिद्धरामय्या यांनी आपला सामना येदियुरप्पा यांच्याबरोबर नसून पंतप्रधान मोदींबरोबर असल्याचे म्हटले होते.