भारतामध्ये दर वर्षी २६ जुलै हा दिवस कारगील विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. १९९९ साली भारताने कारगीलमध्ये पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ६० दिवस सुरु असणारं हे भारत पाकिस्तान युद्ध लडाखमधील उंचावरील भागांमध्ये लढण्यात आलेलं. डोंगराळ भागांमध्ये मागील काही दशकांमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या युद्धांमध्ये कारगील युद्धाचा समावेश होतो. भारताने पाकिस्तानला पराभूत करुन उंच भागांमध्ये पाकिस्तानने ताब्यात घेतलेला भूभाग परत मिळवला.

आज कारगील विजय दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दारसला भेट देणार असून तेथील स्मृतीस्थळावर ते या युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. या ठिकाणी ५२७ दिवे लावून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. तोलोलिंग डोंगराच्या पायथ्याशी हे स्मृतीस्थळ आहे. चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

आजचा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि जनतेचं संरक्षण करणाऱ्या शूरवीर जवानांची आठवण करून देतो. कारगिल युद्धाला आज २२ वर्षे झाली. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची आठवण करुन देणारा हा दिवस. या युद्धामध्ये ५२७ भारतीयांना प्राण गमवावे लागले तर पाकिस्तानमधील मृतांचा आकडा ४५० इतका होता. दिल्लीतील इंडिया गेट येथे अमर जवान ज्योत तेवत ठेवण्यात आलीय. दरवर्षी आजच्या दिवशी पंतप्रधान या ठिकाणी जाऊन कारगील युद्धात भारतमातेचं संरक्षण करताना शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतात.

१९९९च्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम….

> मे ४: कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवल्याची बातमी हाती आली.

> मे ५ ते मे १५: या दहा दिवसांमध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वेक्षण केले. यामध्ये कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेऊन छळ करुन ठार केल्याचे बोलले जाते.

> मे २६: भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले.

> मे २७: भारतीय हवाई दलाचे मीग २७ विमानाला अपघात होऊन ते कारगिलमध्ये पडले. विमान कोसळण्याआधी पॅरेशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर आलेल्या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर आठ दिवसांनी या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले.

> मे ३१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलमध्ये ‘युद्धसदृश्य परिस्थिती’ असल्याची माहिती दिली.

> जून १०: पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैनिकांचे होते. ही टीम पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त हाती आल्यानंतर सर्वेक्षणासाठी गेली होती.

> जून १२: दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक निष्फळ ठरली. भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग आणि पाकिस्तानचे परराष्ट मंत्री सरताज अजीज यांची भेट दिल्लीत झाली. मात्र चर्चेनंतर पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत भारतालाच घुसखोरांनी परत जायला हवे असे सांगितले.

> जून १५: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली

> जून २९: भारतीय लष्कराने टायगर हिल्स प्रदेशातील दोन महत्वाच्या चौक्या ताब्यात घेतल्या.

> जुलै ४: संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. भारतीय लष्कराच्या तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने या प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ताब्यात घेतला. अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट घेतली

> जुलै ५: शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली

> जुलै ११: पाकिस्तानने कारगिलमधून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली

> जुलै १४: भारताने ऑप्रेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

> जुलै २६: कारगिल युद्धाच्या संपल्याची औपचारिक घोषणा केली.