कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा आज निकाल आहे. आतापर्यंत निवडणुकीचे जे निकाल हाती आले आहेच त्यानुसार कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल असं दिसतंय. त्यामुळे देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. अनेक ठिकाणी या विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे. दिल्लीतही काँग्रेस नेत्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयासमोर निष्काळजीपणे फटाके फोडणं एका काँग्रेस नेत्याला महागात पडलं असतं. कारण हा काँग्रेस नेता फटाके फोडत असताना थोडक्यात बचावला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

या काँग्रेस नेत्याने हातात जळत्या फटाक्यांची पेटी घेतली होती. त्यातून एकेक फटाका फुटून बाहेर पडत होता. त्याचवेळी ती पेटी काँग्रेस नेत्याच्या हातातून निसटली आणि खाली पडली. त्यानंतर ती पेटी परत उचलायला गेल्यावर पेटीतून आणखी एक फटाका बाहेर फुटला. हा फटका त्या काँग्रेस नेत्याच्या अगदी चेहऱ्याजवळ फुटला. हा फटाका डोळ्यांसमोरून दूर उडाला. यावेळी काँग्रेस नेता थोडक्यात बचावला. अन्यथा चेहरा भाजला गेला असता.

एएनआय या वृत्तसंस्थेने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहताना तुमच्या लक्षात येईल की, छोटासा निष्काळजीपणा त्या काँग्रेस नेत्याच्या अंगाशी आला असता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकं सगळं होऊनही दुसरा एक काँग्रेस कार्यकर्ता पुढे आला आणि त्याने फटाक्यांची पेटी हातात घेतली. त्यानंतरही फटाके फुटतच होते. त्याने ती पेटी वरच्या बाजूला धरली, त्यातून फटाके फायर होत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची सध्या मतमोजणी सुरू आहे. मतदानानंतर चाचण्यांचे निष्कर्ष काँग्रेसच्या बाजूने होते. तोच कल आता मतमोजणीतही पाहायला मिळत आहे. काँग्रेस आता कर्नाटकात बहुमताचं सरकार स्थापन करेल असं चित्र आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार कर्नाटकात काँग्रेस १३६ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा ६४ आणि जेडीएसला केवळ २० जागांवर आघाडी मिळाली आहे.