कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या शनिवारी (१३ मे) लागणार आहे. निकाल काय लागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कर्नाटकामध्ये कायम सत्ता राखणार? की काँग्रेस बहुमताने निवडून येणार? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. विविध संस्थांच्या एक्झिट पोलनुसार, कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
निवडणूक निकालाला अवघे काही तास उरले असताना मुख्यमंत्रीपदावरून कर्नाटक काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसमधील नेत्यांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे निकालाआधीच काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या संपूर्ण राजकीय हालचालींदरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची अफवा ४० टक्के भ्रष्टाचारवाले लोक करत आहेत. यातील काही लोक सिंगापूरला तर काही लोक बँकॉकला जात आहेत, अशी टोलेबाजी गौरव वल्लभ यांनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- Karnataka Election 2023 Result : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल कधी आणि कुठे तपासायचा?
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करताना गौरव वल्लभ म्हणाले, “कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने जनतेला पाच प्रमुख आश्वासनं दिली आहेत. या आश्वासनांची अंमलबजावणी कशी करायची? याबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही बैठका घेत आहोत. कारण ज्या पद्धतीने ‘एक्झिट पोल’समोर आले आहेत, त्यानुसार उद्या ६ कोटी कन्नाडिगा जिंकणार आहेत, असा आम्हाला विश्वास आहे. हा विजय त्या सर्व लोकांचा आहे, ज्यांनी ४० टक्के भ्रष्टाचाराला हरवलं आणि काँग्रेसच्या पाच आश्वासनांवर विश्वास ठेवला. या पाच योजनांची अंमलबजावणी कशी करायची? यासाठीच आम्ही बैठका घेत आहोत. कर्नाटकच्या लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे. उद्या कर्नाटकच्या नवीन भविष्याचा पहिला सूर्यकिरण उगवणार आहे.”
मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे, याबाबत विचारलं असता गौरव वल्लभ म्हणाले, “४० टक्के भ्रष्टाचारवाले आणि कमिशनवाले जे लोक आहेत, ते अशा अफवा पसरवत आहेत. त्यातील काहीजण सिंगापूरला जात आहेत, काहीजण बँकॉकला जात आहेत. ते सिंगापूर आणि बँकॉकला का जातायत? ते मला माहीत नाही. पण आम्हाला बंगळुरूमध्ये राहून लोकांची सेवा करायची आहे. आम्हाला शिमोगामध्ये राहायचं आहे. ते सिंगापूर फिरत आहेत. त्यांना शिमोगाबद्दल इतकी घृणा का आहे? आणि सिंगापूरवर इतकं प्रेम का आहे? हे माहीत नाही.”