Karnataka MLC Claims He Killed 2500 Stray Dogs: कर्नाटक विधान परिषदेचे आमदार जेडीएसचे एसएल भोजेगौडा यांनी नुकतेच सांगितले की, ते चिक्कमंगळुरू नगरपालिकेचे नगराध्यक्ष असताना त्यांनी “२,५०० कुत्रे मारले” आहेत.
“नगरपालिकाच्या माझ्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात, आम्ही २,५०० कुत्रे मारले आणि त्यांना नैसर्गिक खत म्हणून झाडाखाली पुरले”, असे भोजेगौडा यांनी विधान परिषदेत भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले. भोजेगौडा कोणत्या कालावधीचा उल्लेख करत होते हे स्पष्ट झाले नाही. ते गेल्या अनेक वर्षांपासून विधान परिषद आमदार आहेत. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
कर्नाटकमध्ये या वर्षी आतापर्यंत २.४ लाख कुत्र्यांच्या चाव्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि रेबीजमुळे १९ जणांचा मृत्यू झाला आहे. नगरविकास मंत्री रहीम खान म्हणाले की, सध्याच्या नियमांनुसार भटक्या कुत्र्यांचे फक्त निर्जंतुकीकरण आणि लसीकरण करण्याची परवानगी आहे.
या उत्तरावर प्रतिक्रिया देताना भोजेगौडा म्हणाले की, “जर कोणी रस्त्यांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्यास विरोध करत असेल तर सरकारने त्यांच्या घरात १० भटक्या कुत्र्यांना सोडले पाहिजे.”
जेडीएसचे विधान परिषद आमदार एसएल भोजेगौडा यांनी चिक्कमंगळुरूमधील कुत्र्यांच्या समस्येबद्दल सभागृहात भाष्य केले तेव्हा हा मुद्दा चर्चेत आला. विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी चर्चेत भाग घेतला आणि कर्नाटकात भटक्या कुत्र्यांच्या अनियंत्रित वाढीवर आणि कुत्र्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले.
“नागरिकांना, विशेषतः लहान मुलांना रस्त्यावर चालता येत नाही. आमदार, मंत्री किंवा न्यायाधीशांची मुले कारमधून प्रवास करत असल्याने त्यांच्यावर याचा परिणाम होत नाही, पण सामान्य नागरिकांच्या मुलांचे काय? तुम्ही कधी विचार केला आहे का की, ते इतक्या दिवसांपासून भटक्या कुत्र्यांच्या समस्येला कसे तोंड देत आहेत?”, असेही भोजेगौडा सभागृहात बोलताना म्हणाले. त्यांनी पुढे दावा केला की, कर्नाटकात गेल्या वर्षीच्या तुलनेत कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये ३५% वाढ झाली आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आणि एनआरसी परिसरातील भटक्या कुत्र्यांना रस्त्यावरून हटवण्याचे आणि त्यांना प्राणी निवारा केंद्रात ठेवण्याचे निर्देश दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशभरात वाद निर्माण झाला असून, अनेकजण यावर नाराजी व्यक्त करत आहे.
दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राहुल गांधींच्या या विषयावरील पोस्टला उत्तर देताना म्हटले आहे की, “भटक्या कुत्र्यांशी असे वागवणे हे शासन नाही, ही क्रूरता आहे.”