ईदच्या दिवशी काश्मीरमधील मशिदी आणि पवित्र धार्मिक स्थळे बंद ठेवल्याच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर आगपाखड केली. काश्मीरच्या आजपर्यंतच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. अशाप्रकारे सर्व मशिदी आणि पवित्र धार्मिक स्थळे बंद ठेवल्यामुळे भविष्यात विपरीत पडसाद उमटतील, असा इशारा ओमर अब्दुल्ला यांनी दिला.
जनसंघाच्या आग्रहामुळेच सरकारने ईदच्या दिवशी सर्व मशिदी आणि मुस्लिमांची पवित्र धार्मिक स्थळे बंद ठेवण्याच्या निर्णय घेतल्याची स्थानिक लोकांमध्ये चर्चा आहे. आज सय्यद साहिब दर्ग्याच्या दर्शनासाठी गेलेल्या अनेकांना दर्गा बंद असलेला पाहून धक्का बसला. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे, असे अब्दुल्ला यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.
काश्मीरच्या आतापर्यंतच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. ईदगाह, हजरतबल, मकदूम, साहिब, जामा मस्जिद आणि सय्यद साहिब ही काश्मीरी मुस्लिमांसाठी अत्यंत पवित्र धार्मिक स्थळे आहेत. मात्र, सरकारने ईदच्यानिमित्ताने मशिदी आणि दर्ग्याच्याठिकाणी आलेल्या लोकांना आत जाऊ दिले नाही. याचे गंभीर परिणाम होतील. मलाही ईदची नमाज अदा करता आली नाही, अशी खंत ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.
ईदच्यानिमित्ताने लोक एकत्र जमल्यावर कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सध्या काश्मीर खोऱ्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आंदोलक आणि सुरक्षा रक्षक यांच्यात सकाळी बंदीपूर येथे झालेल्या चकमकीत एक जण ठार झाला. जुलैपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनामध्ये बळी गेलेल्यांची संख्या आता ८० झाली आहे.
