जम्मू-काश्मीरमधील काश्मीरमधील फुटीरतावादी नेते आणि तीनवेळा आमदार राहिलेले सय्यद अली शाह गिलानी यांचं निधन झालं आहे. बुधवारी रात्री गिलानी यांचं निधन झालं. हैदरपोरा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९२ वर्षांचे होते. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास प्रदीर्घ आजारानंतर त्याचं निधन झालं. मात्र गिलानी यांना श्रद्धांजली अर्पण करताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वापरलेली भाषा आता टीकेचा विषय ठरत आहे. गिलानी हे पाकिस्तानी होते असा उल्लेख करत पाकिस्तानचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आलाय. पाकिस्तानने गिलानी यांच्या मृत्यनंतर एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलाय. आज गिलानी यांना सुपुर्दे-ए-खाक केलं जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इम्रान खान यांनी ट्विटरवरुन गिलानी यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. “काश्मिरी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनाची बातमी ऐकून फार दु:ख झालं. गिलानी यांनी आयुष्यभर आपल्या लोकांना स्वत:च्या निर्णयाच्या हक्कासाठी लढण्यास शिकवलं. बारताने त्यांना कैदेत ठेवलं. त्यांच्यावर अत्याचार केले. आम्ही पाकिस्तानमध्ये त्यांच्या संघर्षाला सलाम करतो,” असं म्हटलं आहे. इम्रान यांनी गिलानी यांचा उल्लेख स्वातंत्र्य सैनिक असा केलाय.

दुसऱ्या ट्विटमध्ये इम्रान यांनी, “त्यांच्याच शब्दात त्यांची आठवण काढायची झाल्यास, आम्ही पाकिस्तानी आहोत आणि पाकिस्तान आमचा आहे. पाकिस्तानचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला असून एक दिवस राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात येत आहे,” असं म्हटलंय.

भारतावर आरोप…

गिलानी यांच्या निधनानंतर पाकिस्तानी सेनेचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी शोक व्यक्त केलाय. त्यांनी काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन करणारे गिलानी हे प्रमुख नेते होते असं सांगतानाच बाजवा यांनी भारतावरही आरोप केलाय. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी गिलानी यांना काश्मीरच्या आदोलनाचे मार्गदर्शक असं म्हटलं आहे. गिलानी अंतिम श्वासापर्यंत लढत राहिल्याचं कुरैशी यांनी म्हटलंय.

कोण होते गिलानी?

गिलानी यांचा जन्म २९ सप्टेंबर १९२९ रोजी झाला होता. ते भारताचा केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानला समर्थन करणारे फुटीरतावादी नेते म्हणून ओळखले जायचे. आधी ते जमात-ए-इस्लामी काश्मीर या फुटीरतावादी संघटनेचे सदस्य होते. नंतर त्यांनी तहरीक-ए-हुर्रियतची स्थापना केली. गिलानी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी गटांचं नेतृत्व करणाऱ्या ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्सचं अध्यक्षपद भूषवलं. गिलानी हे १९७२, १९७७ आणि १९८७ मध्ये जम्मू-काश्मीरमधील सोपोरचे आमदार राहिले आहेत. मात्र त्यांनी जून २०२० रोजी हुर्रियत सोडलं. मागील अनेक वर्षांपासून प्रकृतीच्या कारणांमुळे ते सक्रीय राजकारणापासून दूर होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या मृत्यूच्या अफवा अनेकदा पसरल्याचं पहायला मिळालं. गिलानी कुटुंबियांनी त्यांच्यावर हैदरपोरामध्येच दफनविधी करण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केलीय. मात्र गिलानी यांना कुठे दफन केलं जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kashmiri separatist syed ali shah geelani dies at 92 imran khan says he was pakistan national mourning announced scsg
First published on: 02-09-2021 at 10:27 IST