Kedarnath Helicopter Crash Updates: केदारनाथहून चार धाम यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी पहाटे रुद्रप्रयागच्या गौरीकुंडजवळ कोसळून सात जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृतांमध्ये पायलट आणि एका दोन वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. गौरीकुंडपासून सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या गौरी माई खार्क येथे हे हेलिकॉप्टर कोसळले.
या घटनेबद्दल माहिती देताना, कायदा आणि सुव्यवस्था महानिरीक्षक नीलेश भरणे म्हणाले, “रविवारी पहाटे ५.२० वाजताच्या सुमारास, केदारनाथहून गुप्तकाशीला जाणाऱ्या प्रवाशांना घेऊन हेलिकॉप्टर बेपत्ता झाले. ते गौरीकुंडमध्ये कोसळले, ज्यामुळे ७ जणांचा मृत्यू झाला. आम्ही अपघाताचे कारण शोधत आहोत.”
दरम्यान या अपघातात पायलट कॅप्टन राजबीर सिंग चौहान, विक्रम रावत, विनोद देवी, त्रिशती सिंग, राजकुमार सुरेश जयस्वाल, श्रद्धा राजकुमार जयस्वाल आणि दोन वर्षांची काशी यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत पीडित जयपूर, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामान या अपघाताचे संभाव्य कारण मानले जात आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी पोहोचली असून, मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळ कठीण आणि दुर्गम जंगल क्षेत्रात असल्याने बचाव कार्य आव्हानात्मक आहे, असे सडीआरएफ ने सांगितले आहे.
उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाकडून याबाबत अधिकृत निवेदन जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, १५ जून रोजी सकाळी ५:२० वाजता आर्यन एव्हिएशनचे हेलिकॉप्टर VTBKA/BELL ४०७ गौरीकुंडजवळ कोसळले. हेलिकॉप्टर केदारनाथ धामहून गुप्तकाशीला जात होते. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण ६ प्रवासी होते. यामध्ये एका दोन वर्षांच्या मुलीचाही समावेश होता. हेलिकॉप्टरमधील प्रवासी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील आहेत.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रुद्रप्रयाग जिल्ह्याजवळ झालेल्या या हेलिकॉप्टर अपघाताला दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार “एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथकांना मदत आणि बचाव कार्याला सुरूवात केली आहे.”
यापूर्वी ८ मे रोजी गंगोत्रीला जाताना एका हेलिकॉप्टर दरीत कोसळून पाच प्रवासी आणि एका पायलटचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ७ जून रोजी केदारनाथला पाच प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे उत्तराखंडमधील महामार्गावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. उड्डाणादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, ज्यामुळे खबरदारी म्हणून त्याचे रस्त्यावर लँडिंग करण्यात आले होते.
गढवालचे आयजी राजीव स्वरूप यांनी सांगितले की, “अपघातग्रस्त हेलिकॉप्टर केदारनाथला यात्रेकरूंना घेऊन गेल्यानंतर गौरीकुंडला गेले होते. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली ते अतिशय दुर्गम ठिकाण आहे. पोलीस आणि एसडीआरएफ पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत.
गेल्या काही दिवसांतील तिसरा अपघात
गेल्या काही दिवसांत केदारनाथमध्ये झालेला हा तिसरा हेलिकॉप्टर अपघात आहे. यापूर्वी १७ मे आणि त्यानंतर ७ जून रोजी हेलिकॉप्टर अपघात झाले होते. मे महिन्यात देहरादूनहून गंगोत्री धामला जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीतील गंगणीजवळ कोसळले होते. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता.