Kerala Crime News : देशभरात दररोज गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याच्या अनेक बातम्या समोर येतात. खून, दरोडे, मारहाण, संपत्तीचा वाद, घरगुती हिंसाचार किंवा कधी किरकोळ वादातून थेट खून झाल्याच्याही घटना घडतात. मात्र, आता यापेक्षाही भयंकर घटना उघडकीस आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. केरळमधील एका व्यक्तीच्या घरात मानवी हाडांचे तुकडे, दात, रक्ताचे डाग आणि महिलांच्या कपड्यांसह काही वस्तू आढळून आल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

केरळमधील अलाप्पुझा शहरात एका हत्येच्या घटनेचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. त्या ठिकाणी जैनम्मा नावाच्या एका महिलेच्या हत्येतील घटनेचा आरोपी असलेल्या ६८ वर्षीय व्यक्तीवर आता किमान तीन इतर बेपत्ता महिलांच्या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे. या व्यक्तीचं नाव सेबॅस्टियन असं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

जैनम्मा प्रकरणाचा तपास तिचा पती अप्पाचन यांच्या तक्रारीवरून सुरू झाला. त्यानंतर चेरथला जवळील पल्लीपुरम येथील सेबॅस्टियनच्या मालमत्तेची काही दिवसांपूर्वी पोलिसांनी झडती घेतली आणि पोलिसांना मोठा धक्का बसला. या ठिकाणी तब्बल २० जळालेले मानवी हाडांचे तुकडे, दात, तेथील कपड्यांवर रक्ताचे डाग, महिलांचे कपडे आणि महिलांची बॅग अशा विविध वस्तू आढळून आल्या. त्यामुळे या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यानंतर पोलिसांनी या सर्व वस्तू फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवल्या आहेत. पोलिसांना संशय आहे की सेबॅस्टियनने एकटे राहणाऱ्या किंवा एकाकी पडलेल्या महिलांना लक्ष्य केलं असावं. कोट्टायम आणि अलाप्पुझा येथील गुन्हे शाखेचे युनिट्स आता या घटनेचा तपास करत आहेत. सेबॅस्टियनचा २००६ पासून बेपत्ता असलेली एका महिला आणि २०१२ मध्ये बेपत्ता झालेली एक महिला अशा दोन महिलांच्या बेपत्ता होण्याशी या आरोपीचा काही संबंध आहे का? या अनुषंगाने आता पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, दोन महिला बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या बाबतीत न्याय मिळावा यासाठी २०१७ पासून मोहीम राबवणाऱ्या एका कृती परिषदेने तिन्ही प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात सेबॅस्टियनचा काही संबंध आहे का? असेल तर त्याचे साथीदार कोण होते? याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आता या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस यंत्रणा करत असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.