Kerala techie who alleged sexual abuse at RSS shakha video found in his laptop : केरळमधील कोट्टायम जिल्ह्यामध्ये आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका तरुणाच्या मृत्यूची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या तरूणाने आत्महत्या करण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत लैंगिक शोषण झाल्याचे आरोप केले होते. दरम्यान त्याच्या मृत्यूच्या जवळपास एका आठवड्यानंतर त्याच्या लॅपटॉपमध्ये एक व्हिडिओ सापडला आहे. या व्हिडिओमधून एका व्यक्तीचे नाव समोर आले आहे, ज्याने या तरूणाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. दरम्यान या तरूणाची आत्महत्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखेमध्ये लैंगिक शोषण झाल्याचे आरोप, यामुळे सध्या केरळमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

व्हिडीओमध्ये काय सांगितलं?

बुधवारी समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये, या तरुणाने म्हटले आहे की, या व्हिडीओला त्याची आत्महत्या नोट मानले जावे. पुढे त्याने सांगितले की तो तीन वर्षाचा असल्यापासून त्याचे लैंगिक शोषण झाले. तसेच त्याने आरोप केला की, अत्याचार करणारा जो व्यक्ती होता तो आता विवाहित आयुष्य जगतो आहे. लहानपणी झालेल्या शोषणामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचेही त्याने सांगितले. लहान असल्याने तो उघडपणे बोलण्यास घाबरत होता, कारण त्याच्यावर झालेल्या अत्याचाराचा कोणताही पुरावा नव्हता, असेही त्याने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

गेल्या गुरुवारी तरूणाचा तिरुवनंतपुरममध्ये मृत्यू झाला. त्याने इन्स्टाग्रामवर शेड्यूल केलेली एक पोस्ट त्याच्या मृत्यूनंतर पब्लिश झाली, ज्यामध्ये त्याने आरोप केला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत असताना त्याचे लैंगिक शोषण झाले होते आणि या शोषणामुळे तो नैराश्यात गेला होता. त्याने असाही आरोप केला आहे की आरएसएस शाखांमध्ये आजही असा छळ केला जात आहे.

दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. तसेच शाखांमध्ये लैंगिक छळ होत असल्याचा दावा फेटाळून लावला आहे.

कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, तरुणाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी जेव्हा त्याचा लॅपटॉप उघडला तेव्हा त्यांना हा व्हिडीओ आढळून आला. कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, “त्याने लॅपटॉपवर एक कागद ठेवला होता, ज्यावर त्याचा पासवर्ड आणि सिस्टम उघडण्यासाठीता एक संदेश लिहिला होता. त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी कुटुंबीयांनी सिस्टम उघडून तो व्हिडिओ पाहिला. तो व्हिडिओ पोलिसांना देण्यात आला आहे.”

राजकीय आरोप-प्रत्यारोप

या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून काँग्रेस आणि केरळमध्ये सत्ताधारी असलेल्या सीपीआय (एम) या दोन्ही पक्षांनी या तरुणाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केलेल्या आरोपांबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि या मुद्द्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. सीपीआय (एम) ची युवा शाखा असलेल्या डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाने (DYFI) या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी यासंबंधी माध्यमात आलेल्या काही बातम्या त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केल्या आहेत. त्या म्हणाल्या की, त्याने स्पष्टपणे सांगितले आहे की तो एकटाच बळी नव्हता आणि आरएसएसच्या कॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण होत आहे. जर हे खरे असेल, तर हे भीषण आहे. संपूर्ण भारतात लाखो लहान मुले, किशोरवयीन मुले संघाच्या शिबिरांना जातात.”

आरएसएस दक्षिण केरळ सह प्रांत कार्यवाह के.बी. श्रीकुमार म्हणाले की, “आमच्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू दुःखद आणि दुर्दैवी आहे.” श्रीकुमार यांनी असेही म्हटले की, या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये “संघावर काही संशयास्पद आणि निराधार आरोप केले आहेत.”

या घटनेच्या निष्पक्ष चौकशीच्या मागणीचे एक निवेदन कोट्टायम पोलिसांना देण्यात आले आहे, आरएसएसने आरोप केला आहे की संस्थेला या प्रकरणात अडकवण्यासाठी जाणूनबुजून आणि दुर्भावनेने प्रयत्न केले जात आहेत. तसेच संघाने असाही दावा केला आहे की, समाजात प्रतिमा घराब करण्यासाठी आणि बदनामी करण्यासाठीच्या मोठ्या कटाचा हा भाग असू शकतो.