Khan Sir Got Married: सोशल मीडियावर कायम चर्चेत राहणारे आणि विद्यार्थ्यांचे आवडते ‘ऑनलाईन’ शिक्षक म्हणजे ‘खान सर’! आपल्या शिकवण्याच्या विशिष्ट शैलीमुळे खान सरांचे एखाद्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत. त्यामुळे खान सरांची शैली आणि त्याच्याविषयीच्या विविध गोष्टींबाबत नेहमीच त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि फॉलोअर्समध्ये उत्सुकता असते. नुकतीच खान सरांनी त्यांच्या चालू वर्गातच थेट आपलं लग्न झाल्याची घोषणा केली आणि त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांबरोबरच सोशल मीडिया फॉलोअर्सलाही आश्चर्याचा धक्का बसला.

छोटेखानी कार्यक्रमात झालं लग्न!

नुकतीच खान सरांनी त्यांच्या वर्गातच लग्नाची घोषणा केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विवाह छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याआधीच लग्नाची तारीख निश्चित झाली होती. पण ऑपरेशन सिंदूरदरम्यान तणाव अधिकच वाढला होता. त्यामुळे कुणालाही लग्नासाठी आमंत्रित न करण्याचं व मोठा कार्यक्रम न करण्याचं ठरवल्याचं खान सरांनी नमूद केलं आहे.

लहान भाऊ व आईचा आग्रह

दरम्यान, खान सरांचे लहान भाऊ आणि त्यांच्या आईच्या आग्रहास्तव ते लग्नासाठी तयार झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या आईनंच विवाह जुळवून आणल्यानंतर आईचा आग्रह टाळू शकलो नसल्याचं खान सरांनी यावेळी नमूद केलं आहे. मात्र, त्यांनी नेमकं कुणाशी लग्न केलं आहे? याबाबत कोणतीही माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन

आपल्या लग्नासाठी विद्यार्थ्यांना आमंत्रित करता आलं नसल्याची खंत खान सरांनी व्हायरल व्हिडीओमध्ये व्यक्त केली आहे. पण विवाहाला आमंत्रित करता आलं नसलं, तरी विद्यार्थ्यांसाठी विशेष रिसेप्शनचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. येत्या ६ जून रोजी हा कार्यक्रम करण्याचा आपला विचार असल्याचं ते व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत. “माझं अस्तित्वच मुळात तुमच्यामुळे असल्यामुळे ही बातमी मी सर्वात आधी तुम्हाला सांगत आहे”, असं खान सरांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटलं आहे.

कोण आहेत खान सर?

खान जीएस रिसर्च सेंटर व एका यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खान सर वेगवेगळ्या विषयाचे वर्ग घेतात. अत्यंत क्लिष्ट विषय सोप्या भाषेत समजावून सांगण्यात ते वाकबगार असल्याचं त्यांच्याबाबत बोललं जातं. शिकवण्याच्या विशिष्ट शैलीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.