‘गोमांस खाणाऱ्या मुस्लिमांना देशात स्थान नाही’

मुस्लिमांनी गोमांस भक्षण करण्याबाबत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेल्या ताज्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खट्टर यांनी म्हटले होते की, ‘मुस्लिमांना भारतात राहायचे असेल तर त्यांनी गोमांस खाणे बंद केले पाहिजे. त्याने त्यांच्या धार्मिक आस्थांमध्ये काही फरक पडत नसला तरी देशातील हिंदूंसाठी गाय हा श्रद्धेचा विषय आहे.’ त्यांच्या या वक्तव्यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसने याचा देशातील लोकशाहीसाठी दु:खी दिवस म्हणून निषेध केला आहे तर आम आदमी पक्षाने खट्टर यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. या प्रश्नावरून अडचणीत आल्याचे लक्षात आल्याने भारतीय जनता पक्षाने खट्टर यांच्या विधानापासून आपल्याला दूर ठेवण्याची भूमिका घेतली आहे. खट्टर यांचे विधान ही काही पक्षाची अधिकृत भूमिका नाही असे भाजपतर्फे सांगण्यात आले. खट्टर यांनी स्वत:ही आपली खालावलेली प्रतिमा सावरण्याच्या प्रयत्नात आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला, असे म्हटले आहे.
‘माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. मी असे कधी म्हणालोच नव्हतो. तरीही माझ्या बोलण्याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागण्यास तयार आहे,’ असे खट्टर यांनी सांगितले. खट्टर यांचे सल्लागार जवाहर यादव यांनीही संबंधित मुलाखतीत खट्टर यांनी असे विधान केलेच नव्हते अशी पुस्ती जोडली. यावर इंडियन एक्स्प्रेसने त्या मुलाखतीची ध्वनिफीत जाहीर केली. त्यात खट्टर स्पष्टपणे वादग्रस्त विधान करत असल्याचे दिसत आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते राजदीप सुरजेवाला यांनी म्हटले की, ‘भारतीय लोकशाहीसाठी हा दु:खी दिवस आहे. आता मुख्यमंत्री खट्टर देशाच्या नागरिकत्वाचे निकष ठरवणार. मोदींच्या राज्यकारभाराचे हेच नवे मॉडेल आहे का?’ काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी सांगितले की खट्टर यांचे विधान राज्यघटनेच्या विरोधातील आहे आणि त्यांना मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा काही अधिकार नाही.
जनता दल (युनायटेड)चे अध्यक्ष शरद यादव यांनी म्हटले की, भाजपचे नेते मुस्लिमांना टोमणे मारत असतात आणि त्यांना पाकिस्तानला चालू लागावे, असे सांगतात. पण ईशान्य भारतातील गोमांस खाणाऱ्या नागरिकांबाबत ते काय भूमिका घेणार? त्यांनी भारत म्हणजे काही युरोप किंवा चीन नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
यावर सारवासारव करताना भाजप नेते आणि संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले, ‘खट्टर यांनी व्यक्त केलेली मते ही काही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. मी त्यांच्याशी बोलून त्यांना सल्ला देईन. अशा प्रकारे बोलणे चुकीचे आहे. एखाद्याच्या आहारविषयक सवयींचा धर्माशी संबंध जोडणे योग्य नाही. लोकांनी काय खावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.’