संत नामदेवांच्या कर्मभूमीत म्हणजेच पंजाब येथील घुमानमध्ये होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह तयार करणारे चित्रकार ख्वाजा सय्यद यांच्या कुंचल्यातून साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाची सजावट साकारणार आहे. घुमान येथील गव्हर्नमेंट बॉइज हायस्कूलच्या पटांगणात उभारण्यात आलेल्या मंडपात हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. व्यासपीठ सजावटीच्या कामात व्यग्र असतानाच सय्यद यांनी याविषयी माहिती दिली.
घुमान येथे पहिल्यांदाच होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर १० फूट उंचीचा आणि ४७ फूट रुंदीचा मोठा पडदा तयार करण्यात आला असून त्यावर मराठीतील काही प्रसिद्ध साहित्यिकांच्या नावाचा कोलाज तयार करण्यात आला आहे. या पडद्यावर संमेलनाचे बोधचिन्ह ‘थ्रीडी’ स्वरूपात पाहायला मिळेल. हे बोधचिन्ह साडेसहा फूट उंचीचे आहे. व्यासपीठाला ‘लाल-बाल-पाल’ यांचे नाव देण्यात आले आहे. या सजावटीचे खास आकर्षण म्हणजे मराठीतील काही निवडक पुस्तकांच्या मुखपृष्ठांच्या प्रतिकृती! प्रत्येक पुस्तकाच्या मुखपृष्ठाची प्रतिकृती साडेसहा फूट उंचीची असून अशा १५ पुस्तकांच्या मुखपृष्ठांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत.
अवकाळी पाऊस
गेल्या दोन दिवसांपासून घुमानमध्ये पावसाळी वातावरण असून बुधवारी दिवसा आणि दुपारनंतर गावात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे संमेलनस्थळी काही प्रमाणात चिखल झाला होता. मात्र त्यावर कोरडी माती टाकण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. पुढील दोन-तीन दिवसही असेच पावसाळी वातावरण राहणार असल्याने संमेलनाच्या आयोजनात अडथळा येणार नाही, याची काळजीही घेण्यात आली आहे.
‘अभिरूप न्यायालया’त वकील हजर पण..
नागपूर : अभिरूप न्यायालय हे साहित्य संमेलनातील लोकप्रिय सत्र, पण या सत्रालाच संमेलन पत्रिकेने गालबोट लावले आहे. ‘दृक-श्राव्य माध्यमातील संहितालेखन’ हा विषय न्यायालयासमोर ठेवण्यात आला. या कार्यक्रमात रामदास फुटाणे, संजय मोने, सुधीर गाडगीळ, मोहन जोशी, राजन खान यांच्यासह दहा आरोपी म्हणून कोणत्या मान्यवराला उभे करणार, याचा काहीच उल्लेख कार्यक्रम पत्रिकेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2015 रोजी प्रकाशित
चित्रकार ख्वाजा सय्यद यांच्या कुंचल्यातून संमेलन व्यासपीठ
संत नामदेवांच्या कर्मभूमीत म्हणजेच पंजाब येथील घुमानमध्ये होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह तयार करणारे चित्रकार ख्वाजा सय्यद यांच्या कुंचल्यातून साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाची सजावट साकारणार आहे.
First published on: 02-04-2015 at 03:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khwaja sayyad ghuman sahitya sammelan