कोलकाता येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेला हायकोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे. या सभेत सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित राहणार आहेत. या सभेला कोलकाता पोलिसांनी परवानगी नाकारल्याने संघ आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जुंपली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोलकातामधील ब्रिगेड परेड मैदानावर १४ जानेवारीरोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सभा होणार आहे. या सभेत सरसंघचालकही उपस्थित राहणार आहेत. या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने संघाने कोलकाता हायकोर्टात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने संघाच्या सभेला सशर्त परवानगी दिली. या सभेला बाहेरच्या व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही. फक्त निमंत्रितांनाच सभेत उपस्थित राहता येईल. तसेच या सभेला येणारी गर्दी ही चार हजारच्या जाऊ नये अशी महत्त्वपूर्ण अटही कोर्टाने घातली आहे. दुपारी २ ते संध्याकाळी ६ या कालावधीमध्येच सभा घ्यावी असे हायकोर्टाच्या आदेशात म्हटले असून सभेच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करावा असे हायकोर्टाने म्हटले आहे.

कोलकात्यामध्ये होणा-या सभेवरुन तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जुंपली होती. पोलिसांनी दोन वेळा या सभेला परवानगी नाकारली होती. कोलकाताच्या पश्चिमेकडील किद्दरपोर येथील भूकैलाश मैदानावर सभा घेण्याबाबत संघाने पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी या मैदानावर सभा घेण्यास परवानगी नाकारली होती. भूकैलाश मैदानावरील सभेला गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत मैदान लहान आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण देत पोलिसांनी या मैदानावर सभा घेण्यास परवानगी नाकारली होती. त्यानंतर ब्रिगेड परेड मैदानावर सभेसाठी परवानगी मिळावी, अशी विनंती संघाच्या नेत्यांनी केली होती. पण पोलिसांनी पुन्हा या मैदानावर सभा घेण्यास परवानगी नाकारली. ब्रिगेड परेड मैदान खूप मोठे आहे. त्यात तेथून गंगासागर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना अडचणी निर्माण येऊ शकतील, असे कारण पोलिसांनी देत तिथेही सभा घेण्यास परवानगी नाकारली होती.

नोटाबंदीवरुन तृणमूल काँग्रेस आक्रमक झाली आहे. पक्षाच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठवत आहे. ममता बॅनर्जींनी तिखट शब्दात मोदींवर प्रहार केला आहे. यात भर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेला परवानगी नाकारल्याने भाजप आणि तृणमूलमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता होती. ही सभा संघासाठी प्रतिष्ठेचा विषय बनली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata highcourt grants permission for rss in rally in kolkata
First published on: 13-01-2017 at 17:11 IST