Kolkata Law Student Rape Case: कोलकाता येथील आर जी कर महाविद्यालय आणि रुग्णालयातील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना ९ ऑगस्ट २०२४ रोजी घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणात आरोपी संजय रॉयला न्यायालयाने शिक्षा देखील सुनावली. दरम्यान, त्या प्रकरणानंतर आता कोलकाता पुन्हा एकदा हादरलं आहे. कोलकातामधील एका लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या आरोपानंतर या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण कोलकात्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेतील तीन आरोपींपैकी एक आरोपी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा नेता असल्याचं सांगितलं जात आहे. या आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आलं असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

या प्रकरणातील तक्रारीनुसार बुधवारी संध्याकाळी ७.३० ते १०.५० या दरम्यान कोलकाता येथील एका लॉ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. संबंधित तरुणीच्या तक्रारीनंतर या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेत दोन विद्यार्थी आणि एका कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. हा कर्मचारी कॉलेजचा माजी विद्यार्थी आणि तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा नेता आहे.

दरम्यान, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय ही तरुणी बुधवारी परीक्षेशी संबंधित फॉर्म भरण्यासाठी कॉलेजमध्ये गेली होती. तिने दिलेल्या तक्रारीनुसार ती सुरुवातीला कॉलेजमधील एका रूममध्ये बसली होती. मात्र, त्यानंतर या घटनेतील मुख्य आरोपीने कॉलेजचं गेट बंद करण्याचं सांगितलं आणि त्यानंतर कॅम्पसमधील सुरक्षा रक्षकाच्या खोलीत या तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचं तिने तक्रारीत म्हटल्याचं वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.

अमित मालवीय यांनी काय म्हटलं?

भारतीय जनता पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी या घटनेवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. अमित मालवीय यांनी म्हटलं की, “भयानक! २५ जून रोजी कोलकाता येथील एका महाविद्यालयात एका कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी आणि दोन महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनीच या घटनेचा समावेश असल्याचं धक्कादायक वृत्त आहे. धक्कादायक म्हणजे, तृणमूल काँग्रेसच्या एका सदस्याचाही यात सहभाग असल्याचे वृत्त आहे. आरजी करची दहशत कमी झालेली नाही, तरच बंगालमध्ये असे घृणास्पद गुन्हे दररोज वाढत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत, पश्चिम बंगाल महिलांसाठी एक भयानक बनलं आहे. बलात्कार ही एक नेहमीची शोकांतिका बनली आहे. भाजपा संबंधित पीडिता आणि तिच्या कुटुंबाबरोबर आहोत, प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही”, असं अमित मालवीय यांनी एक्सवरील पोस्टमध्ये (ट्विट) म्हटलं आहे.