लालूप्रसाद यादव यांच्याकडे राजकीय चमत्कार करून दाखविण्याची क्षमता आहे, याबद्दल कोणाचेही दुमत नसेल. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या करिष्म्याला काहीशी उतरती कळा लागली असली तरी मागीलवर्षी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये अनुभवाच्या जोरावर त्यांनी भाजपचा विजयरथ रोखला होता. लखनऊमध्ये शनिवारी झालेल्या समाजवादी पक्षाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात लालूंनी असाच काहीसा चमत्कार करून दाखवला. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यातील संघर्ष शिगेला आहे. मध्यंतरीच्या काळात पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी पक्ष बैठकीत दोघांमध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अखिलेश आणि शिवपाल यादव एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. मात्र, लालूप्रसाद यादव यांनी शनिवारी जाहीर व्यासपीठावर या दोघांची हातमिळवणी करण्यास भाग पाडले. एवढेच नव्हे तर यावेळी अखिलेश चक्क खाली वाकून शिवपाल यादव यांच्या पाया पडले. त्यानंतर शिवपाल यादव यांनी आपल्या भाषणात अखिलेश यादव यांच्या कामाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तसेच आपण मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत नसल्याचेही शिवपाल यादव यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून अखिलेश आणि शिवपाल यादव यांच्यातील टोकाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांसाठी आजचा प्रकार आश्चर्याचा धक्का देणारा होता, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव यांनी शिवपाल यादव यांच्याकडील खाती काढून घेतल्यानंतर या वादाला सुरूवात झाली होती. त्यानंतर शिवपाल यादव यांनी पक्षातील अखिलेश समर्थकांचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व वादामुळे अखिलेश यादव स्वतंत्र पक्ष काढणार असल्याची चर्चाही रंगली होती. मात्र, विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने या दोघांनी नमते घेतले होते.