लोक मांसाहारी झाल्याने हिमाचलमध्ये ढगफुटी झाली असा अजब दावा आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांनी केला आहे. यावर्षी हिमाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलनामुळे राज्याचं मोठं नुकसान झालं. भूस्खलनाच्या घटना का वाढल्या? याची तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात आली, तसंच यावर अभ्यासही सुरु आहे. अशात IIT च्या संचालकांनी हा अजब दावा केला आहे.

विद्यार्थ्यांना मांस न खाण्याचं केलं आवाहन

आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांनी तर विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ घ्या असंही आवाहन केलं आहे. प्राण्यांची मांसाहारासाठी क्रौर्याने हत्या केली जाते. त्याच क्रौर्यामुळे हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटना घडत आहेत असा दावा बेहरा यांनी केला. बेहरा यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

बेहरा नेमकं काय म्हणाले?

“आपण हिमाचल प्रदेशात राहतो, जर इथले लोक मांसाहार करत राहिले तर हिमाचल प्रदेशात भूस्खलनाच्या आणखी घटना घडतील. तुम्ही निष्पाप प्राण्यांची हत्या करत आहात. त्याचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांशी संबंध आहे. तुम्ही ते पाहू शकत नाही पण तो परिणाम होतोच.” असं बेहरा म्हणत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हिमाचल प्रदेशात वारंवार होणारं भूस्खलन, ढगफुटी आणि इतर ज्या नैसर्गिक समस्या येत आहेत ते सगळे प्राण्यांवरच्या क्रूरतेचे परिणाम आहेत. लोक मांसाहार करतात आणि अशा समस्या त्यामुळे ओढवतात. चांगला माणूस होण्यासाठी लोकांनी मांस खाणे बंद करायला हवं असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ घ्या असंही आवाहन केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेहरा यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जातं आहे. आयआयटीचे दिल्लीचे माजी विद्यार्थी संदीप मनुधाने यांनी ट्विटरवर म्हटलं आहे की जे काही ७० वर्षांत निर्माण केलं गेलं आहे ते असे अंधश्रद्धाळू नष्ट करत आहेत. बेहरा यांचं वक्तव्य चुकीचं आहे असं प्राध्यापक गौतम मेनन यांनीही म्हटलं आहे.