भारताचा एक मोठा शत्रू पाकिस्तानात मारला गेला आहे. लष्कर-ए-तैयबाचा माजी कमांडर अकरम खान उर्फ अकरम गाझी याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अकरम हा सातत्याने भारताविरोधात प्रक्षोभक भाषणं करायचा. २०१८ ते २०२० या तीन वर्षाच्या काळात तो लष्करमध्ये तरुणांना भरती करण्याचं काम करत होता. अकरम गाझी याला गुरुवारी (९ नोव्हेंबर) पाकिस्तानच्या बाजौर भागात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून त्याची हत्या केली आहे. गाझीवर गोळ्या झाडून हल्लेखोर तिथून पळून गेले अकरम हा लष्करच्या काही वरिष्ठ कमांडर्सपैकी एक होता. अनेक वर्ष तो भारतविरोधी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता.

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात दहशतवादी संघटनांशी संबंधित, भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्याचं सत्र सुरू आहे. अकरम गाझीची हत्या होण्यापूर्वी अलिकडच्या काही महिन्यांमध्ये मुफ्ती कैसर फारूक, खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवड, एजाज अहमद अहंगर, बशीर अहमद पीरसारख्या काही दहशतवाद्यांच्या अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्या आहेत.

पाकिस्तानात सातत्याने होत असलेल्या या हत्यांमुळे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांची झोप उडाली आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानात भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहिद लतीफची हत्या करण्यात आली होती. अज्ञात हल्लेखोरांनी सियालकोट भागात लतीफची गोळ्या घालून हत्या केली होती. लतीफ हा भारतातल्या पठाणकोट येथील वायूदलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागचा मास्टरमाईंड होता. तो पाकिस्तानात बसून पठाणकोटवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना निर्देश देत होता. त्यानेच त्या चारही दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन भारतात पाठवलं होतं.

हे ही वाचा >> पाकिस्तानातून परदेशी जाणाऱ्यांना मनस्ताप, ‘या’ कारणामुळे नागरिकांना पासपोर्ट मिळेना

सियालकोटजवळच्या एका मशिदीत शाहीदची हत्या करण्यात आली. दोन हल्लेखोर मोटारसायकलवरून आले, त्यांनी शाहीदवर गोळ्या झाडल्या आणि तिथून फरार झाले. या हत्याकांडानंतर पोलिसांनी सियालकोट भागात नाकाबंदी केली. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन हाती घेतलं. परंतु, या हत्येला महिना उलटला तरी अद्याप हल्लेखोर पाकिस्तानी पोलिसांच्या हाती लागले नाहीत.