Sonali Phogat Death: अभिनेत्री आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये पार्टीदरम्यान फोगट यांच्या दोन सहकाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीने घातक पेयं प्यायला दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या पेयाच्या सेवनानंतर फोगट यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर रुग्णालयात दाखल करताच त्यांना डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दुरदर्शन अँकर, टिकटॉक स्टार ते राजकीय नेत्या; कोण होत्या सोनाली फोगट ज्यांच्यावर भाजपाने दिली होती मोठी जबाबदारी

रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही कॅमेरा आणि काही जणांच्या कबुली जबाबातून ही बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुधीर संगवान आणि सुखविंदर सिंग या फोगट यांच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली आहे. घटनेचे पुरावे नष्ट करण्यात येऊ नयेत, यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. “रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही तपासल्यानंतर सुधीरने सोनालीला जबरदस्तीने एका बाटलीतील पेय पाजल्याचे समोर आले आहे”, असे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

४२ वर्षीय सोनाली फोगट यांचा उत्तर गोव्याच्या अंजुनामधील सेंट अँन्थोनी रुग्णालयात २३ ऑगस्टला मृत्यू झाला होता. कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाबाबत संशय व्यक्त केल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदन अहवालात फोगट यांच्या शरिरावर जखमा आढळून आल्या होत्या. फोगट यांच्या मृत्यूचं खरं कारण शोधण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्वांकष तपास करण्यात येत आहे.

Video : ‘रुख से जरा..’ निधनाआधी सोनाली फोगाट यांनी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट ठरली अखेरची!

दरम्यान, फोगट यांच्यावर मृत्यूपूर्वी बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप देखील त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या आरोपांबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. संपत्ती बळकावण्यासाठी आणि राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी हत्या करण्यात आल्याचा आरोप सोनालीचे भाऊ रिंकू ढाका यांनी केला आहे. सोनाली फोगट यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.