CJI B.R.Gavai Shoe Incident SC : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका ७१ वर्षीय वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या वकिलाचं नाव राकेश किशोर असं असून घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनी कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिल्यानंतर राकेश किशोर यांची सुटका करण्यात आली.
सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात आता वकील राकेश किशोर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण राकेश किशोर यांच्याविरुद्ध बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑल इंडिया अॅडव्होकेट्स असोसिएशनचे अध्यक्ष भक्तवचल यांच्या लेखी तक्रारीवरून मंगळवारी संध्याकाळी बंगळुरूमधील विधान सौधा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
दरम्यान, ही घटना ज्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या पोलीस ठाण्याच्या अधिकारक्षेत्राबाहेर घडली असल्यामुळे संबंधित एफआयआर हा नोंद झाल्यानंतर विधान सौधा पोलिसांनी नवी दिल्लीतील टिळक मार्ग पोलीस ठाण्यात हस्तांतरित केला असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
तक्रारीत ऑल इंडिया अॅडव्होकेट्स असोसिएशनने या घटनेचा निषेध व्यक्त करत ही घटना गंभीर असून न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. तसेच राकेश किशोर यांचं कृत्य समाजाच्या कोणत्याही वर्गाला माफ करण्यायोग्य आणि स्वीकारार्ह नाही. ही घटना गांभीर्याने घेतली पाहिजे आणि कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, असं असोसिएशनने म्हटलं आहे.
न्यायालयात नेमकं काय घडलं होतं?
वकील राकेश किशोर सरन्यायाधीशांच्या दिशेने धावून गेला आणि तो पायातला बूट काढू लागला. त्याचवेळी न्यायालयातील सुरक्षारक्षक त्याच्या दिशेने धावले. वकील बूट काढून सरन्यायाधीशांच्या दिशेने भिरकावणार इतक्यात सुरक्षारक्षकांनी त्याला पकडलं आणि न्यायालयाबाहेर नेलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. “सनातन का अपमान… नहीं सहेगा हिंदुस्तान…” , अशा घोषणा या वकिलाने यावेळी दिल्या होत्या.
कोण आहेत राकेश किशोर?
पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, राकेश किशोर हे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे नोंदणीकृत सदस्य आहेत आणि ते दिल्लीच्या मयूर विहार परिसरात राहतात. त्यांनी २००९ मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये नोंदणी केली होती. ज्येष्ठ वकील असलेले राकेश किशोर हे अनेक वर्षांपासून विविध बार असोसिएशन्सचे सदस्य राहिले आहेत.