Kailash Vijayvargiya Controversial Statement: भाजपाचे मध्य प्रदेशमधील ज्येष्ठ नेते आणि सरकारमधील नगरविकास व गृहनिर्माण मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी गुरूवारी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर एक आक्षेपार्ह विधान केले. विजयवर्गीय यांनी म्हटले की, विरोधी पक्षनेता आपल्या बहिणीचा जाहीर मुका घेतो. त्यांच्यात संस्काराची कमतरता आहे.
शाजापूर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात कैलाश विजयवर्गीय म्हणाले, “आजचे आपले विरोधी पक्षनेते असे आहेत जे स्वतःच्या बाहिणीला सार्वजनिक ठिकाणी किस करतात. मी तुम्हाला (लोकांना) विचारू इच्छितो, तुमच्यापैकी कुणी असा आहे का, जो आपल्या तरूण मुलीला किंवा बहिणीला अशापद्धतीने सार्वजनिक ठिकाणी किस करत असेल. यांच्या संस्काराचा अभाव आहे. यांचे संस्कार विदेशी आहेत. भारतात फक्त आपलेच संस्कार चालणार.”
कैलास विजयवर्गीय यांच्या या विधानावर काँग्रेस पार्टीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने म्हटले की, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेला भाजपाचने नेते पचवू शकलेले नाहीत.
काँग्रेसचे प्रवक्ते अभिनव बरोलिया यांनी म्हटले की, त्यांनी महिलांच्या कपड्यांवरून अश्लाघ्य विधान केले आहे. यावरून त्यांची मानसिकता दिसून येते. त्यांनी राजकीय शिष्टाचार मोडला असून त्याचा अवमान केला आहे. त्यांना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची लोकप्रियता रुचलेली दिसत नाही.