आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी बुधवारी खासगी आणि राजकीय कारणांमुळे त्यांच्या पंतप्रधानपदाचा आणि पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे देशातील नागरिक आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. वराडकर यांनी म्हटलं आहे की, मी आजपासून पक्षाच्या अध्यक्ष आणि नेतेपदाचा राजीनामा देत आहे. मी पंतप्रधानपद आणि पक्षाचं नेतृत्व सोडण्याची कारणं वैयक्तिक आणि राजकीय आहेत. सात वर्षांच्या कार्यकाळानंतर मला आता असं वाटतंय की, मी या पदासाठी योग्य व्यक्ती नाही.

लिओ वराडकर म्हणाले, “मला पक्षात इतर लोकांना संधी द्यायची आहे. मुलांचे हक्क, एलजीबीटीक्यू समुदाय, महिलांसाठी समानता आणि त्यांची स्वायत्तता याबाबत देशाची परिस्थिती खूप सुधारली आहे. आपण खूप आधुनिक झालो आहोत याचा मला अभिमान आहे. तसेच माझा उत्तराधिकारी हे पद सांभाळण्यास सक्षम झाल्यानंतर मी ताओइसेच पद सोडून देईन.” आयर्लंडमध्ये ताओइसेच हे पद महत्त्वाचे मानले जाते. ताओइसेच हा पंतप्रधानपदासाठीचा आयरिश शब्द आहे.

हे ही वाचा >> आचारसंहिता असतानाही व्हॉट्सॲपवर ‘विकसित भारत’चा मेसेज, निवडणूक आयोगाकडून केंद्र सरकारला महत्त्वाचे निर्देश

डिसेंबर २०२२ मध्ये वराडकर यांची दुसऱ्यांदा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाली होती. मूळचे कोकणातील असलेल्या वराडकर यांनी २०१७ मध्ये आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर २०२० च्या निवडणुकीत त्यांना अपयश आले. मात्र अडीच वर्षांनंतर वराडकर पुन्हा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवडून आले. त्यानंतर आता १४ महिन्यांनी त्यांनी पंतप्रधानपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा >> विश्लेषण: मराठी वंशीय लिओ वराडकर आयर्लंडचे दुसऱ्यांदा पंतप्रधान… काय आहे हे व्यक्तिमत्त्व?

वराडकर यांच्या भारतीय वंशाबाबत…

मूळ भारतीय वंशाचे असलेले लिओ वराडकर यांचे वडील अशोक हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील वराड गावचे आहेत. लिओ यांच्या पित्याचा म्हणजेच अशोक वराडकर यांचा जन्म मुंबईत झाला. व्यवसायाने डॉक्टर असलेले अशोक वराडकर १९६०च्या दरम्यान ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. तिथे परिचारिका असलेल्या मिरिआम या आयरिश महिलेच्या ते प्रेमात पडले आणि त्यांनी १९७१ मध्ये विवाह केला. लिओ यांचा जन्म १९७९ मध्ये डब्लिन येथे झाला. त्यांना सोफिया आणि सोनिया या दोन ज्येष्ठ भगिनी आहेत. आयर्लंडमध्ये शिक्षण घेतलेल्या लिओ यांनी २००३ मध्ये मुंबईतील केईएम रुग्णालयात इंटर्नशिप केली. २०१८ मध्ये वराडकर यांनी कोकणातील आपल्या मूळ गावी म्हणजे वराड गावाला भेट दिली होती. ग्रामदैवत वेतोबाचे दर्शन घेऊन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला होता.