देशात लोकसभेची निवडणूक सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. कर्नाटकमध्ये भाजपा आणि एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दल (सेक्युलर) या पक्षांमध्ये युती झाली आहे. एच. डी. देवेगौडा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तसेच ते भारताचे पंतप्रधानही राहिलेले आहेत. एच. डी. देवगौडा आणि त्यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी हे आपल्या पक्षाची ताकद कर्नाटकमध्ये वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने एकूण २८ पैकी २५ जागांवर विजय मिळविला होता; तर काँग्रेसला एका व जेडीएसला एका जागेवर विजय प्राप्त झाला होता. तर, एका जागी अपक्ष उमेदवार निवडून आला होता.
१९९९ पासून देवेगौडा लोकसभेची निवडणूक लढवीत आहेत. मात्र, यावेळी पहिल्यांदाच ते स्वत:हून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नाहीत. यावेळी ते आपल्या पक्षाचा आणि एनडीएचा प्रचार करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी दक्षिण कर्नाटकातील बेंगळुरू ग्रामीण, तुमकूर, चिकमंगळूर, म्हैसूर, चिक्कबल्लापूर येथे प्रचारही केला आहे. या ठिकाणी त्यांच्या पक्षाचे वर्चस्व अधिक आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली मते प्रकट केली आहेत.
हेही वाचा : गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडूनच भाजपाला देणग्या; राजस्थानमधील एकमेव डाव्या उमेदवाराचा आरोप
जेडीएस आणि भाजपाची युती प्रत्यक्ष मैदानात कशाप्रकारे काम करते आहे?
आम्हाला कोणतीही अडचण येत नाही… जेडीएस आणि भाजपाची ही युती फक्त लोकसभेच्या निवडणुकीकरिताच नाही, तर विधानसभेच्या निवडणुकीसाठीही असेल.
भाजपासोबत झालेली ही युती २०१९ मध्ये काँग्रेससोबतच्या युतीपेक्षा अधिक चांगली आहे का?
काँग्रेस काय आहे ते आम्हाला माहीत आहे. आम्ही किती वेळा त्यांच्यासोबत तोच प्रयोग करायचा? या निवडणुकीमध्ये जेडीएस तीन जागांवर, तर भाजपा २५ जागांवर लढत आहे. २०१९ मध्ये राज्यात जेडीएस काँग्रेससोबत सत्तेत होती. आम्ही सात जागांवर, तर ते २१ जागांवर लढले. तरीही दोघांनाही एकेकच जागा जिंकता आली. भाजपाला २५ जागांवर यश मिळाले.
सध्या देशाचे नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सक्षम असल्याचे तुम्ही प्रचारसभांमध्ये सांगत आहात, असे तुम्हाला का वाटते?
देशाचे नेतृत्व करू शकेल, अशी क्षमता इंडिया आघाडीतील कुणामध्ये आहे, ते सांगा. मला एक व्यक्ती दाखवून द्या. इंडिया आघाडीत अशी एक जरी सक्षम व्यक्ती असेल, तर चर्चा करण्याचीही गरज नाही. सध्या भारतात नरेंद्र मोदींशिवाय दुसरे कुणीही त्या क्षमतेचे नाही. मी ९१ वर्षांचा आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी तिसऱ्यांदा घेऊ शकेल, अशी नरेंद्र मोदींशिवाय दुसरी कोणतीही व्यक्ती मी पाहिलेली नाही.
बऱ्याच लोकांना असे वाटते की, भाजपासोबत युती केल्याने येणाऱ्या काळात जेडीएसचा जनाधार कमी होईल. तुम्हाला काय वाटते?
असे कुणाला वाटते? असे मुख्यमंत्री सिद्धरामैया आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार या काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील निवडणुकांमध्ये काँग्रेसला मदत करण्यासाठी ते राज्यातील संसधानांची लूट करीत आहेत. पण, काय घडले?
राहुल गांधी असे म्हणत आहेत की, मोदी लाट वगैरे काही नसून भाजपाला देशात १५० हून अधिक जागा मिळणार नाहीत. तुम्हाला काय वाटते?
राहुल गांधी यांनी तीन दिवसांपूर्वी कोलारमध्ये सभा घेतली. मला त्यावर काहीही टिप्पणी करायची नाही. राहुल गांधींच्या वक्तव्यावर पिनाराई विजयन काय म्हणालेत, ते आपण पाहिले आहे. त्यांनी माकपचे दिग्गज नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत म्हटले की, राहुल गांधी अजूनही ‘अमूल बेबी’ आहेत.
ही निवडणूक काँग्रेसची ‘गॅरंटी योजना’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेगौडा यांच्या नेतृत्वामधील लढाई आहे का?
काँग्रेसची ‘गॅरंटी’ राजस्थान, छत्तीसगड अथवा मध्य प्रदेशमध्ये चालली नाही. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ही आश्वासने दिली आहेत. लोकांना लगेच असे वाटले की, काँग्रेसने चांगला कार्यक्रम दिला आहे. आता त्यांनी ‘२८ गॅरंटीं’चे आश्वासन दिले आहे. मात्र, ते केंद्रात सत्तेवर येतील का? गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांना विरोधी पक्षनेतेपदाचीही मान्यता मिळू शकलेली नाही. खरगे आहेत, सोनिया गांधी आहेत, राहुल गांधी आहेत; पण मान्यता मिळविण्यासाठी त्यांना ५५ जागाही मिळवता आल्या नाहीत. लोक मूर्ख नाहीत.
१९९६ मध्ये १३ पक्षांचे युती सरकार सत्तेवर आल्यानंतर तुम्ही पंतप्रधान झालात. त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती?
तेरा पक्षांचे सरकार सत्तेत आल्यानंतर पंतप्रधानपदाची धुरा माझ्यावर सोपविण्यात आली. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार १३ दिवसांत कोसळले तेव्हा संयुक्त आघाडीच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. काँग्रेस कार्यकारिणी समितीमध्ये चर्चा केल्यानंतर नरसिंह राव यांनी १२ मे १९९६ रोजी असा निर्णय घेतला की, ते सरकार स्थापन करणार नाहीत. भाजपा वगळता इतर सर्व पक्ष एकत्र येत असतील, तर ते बाहेरून पाठिंबा देतील. त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर माकपने असा निर्णय घेतला की आपण सरकार स्थापन करू शकतो. जनता दलाने तेव्हा १६ जागा जिंकल्या होत्या. मी कर्नाटकचा मुख्यमंत्री होतो. त्यांनी आम्हा सर्वांना बोलावून घेतले. आम्ही भेटून असा प्रस्ताव मांडला की, व्ही. पी. सिंग यांना पंतप्रधान करावे. मुरासोली मारन, चंद्राबाबू नायडू आणि मी त्यांच्या (व्ही. पी. सिंग यांच्या) घरी गेलो. त्यांनी आम्हाला बसवले आणि चहा दिला. आम्ही दोन तास बसलो आणि त्यानंतर त्यांनी सांगितले की, ते या निर्णयाशी सहमत नाहीत. त्यानंतर आम्ही ज्योती बसू यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी होकार दिला. त्यानंतर त्यांनी बंगा भवन येथे पॉलिट ब्युरोची बैठक बोलावली. मात्र, माकपच्या तरुण कार्यकर्त्यांना ते मान्य नव्हते. ते परत आले आणि त्यांनी पंतप्रधानपदासाठी माझे नाव सुचवले.
हेही वाचा : तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
मी मुस्लिमांना आरक्षण दिले होते, ईदगाह मैदानाचा प्रश्न सोडवला होता आणि महिला आरक्षणाचा प्रस्ताव दिला होता. कदाचित ही त्यामागची कारणे होती. या कार्यक्रमांमुळे आम्हाला १६ जागा जिंकता आल्या होत्या. जनता दलाला याआधी एवढे यश कधी मिळालेले नव्हते. मी काही मूलभूत आणि कठोर पावले उचलली होती. सिंचन प्रकल्पांना प्राधान्य दिले होते. संयुक्त आघाडीने माझे नाव निश्चित केले. माझे राजकीय जीवन खराब होईल, असे मी म्हणालो. कारण, मी मोठ्या कष्टानंतर मुख्यमंत्री झालो होतो आणि पदावर येऊन फक्त १८ महिनेच झाले होते. माझ्या मनात संकोच होता. ते म्हणाले की, मग आम्हाला मीडियासमोर जाऊन हे सांगावे लागेल की, वाजपेयींसमोर उभा राहू शकेल असा एकही नेता आमच्याकडे नाही. मी म्हणालो की, असे सांगू नका. कारण- वाजपेयींसमोर उभे राहू शकणारे अनेक लोक आहेत. त्यानंतर मग मी तो प्रस्ताव मान्य केला.