पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये आज (३० सप्टेंबर) पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पोट निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं याकडे अनेकांचं लक्ष आहे. भाजपनेही ममता बॅनर्जी उभ्या असलेल्या भवानीपूर मतदारसंघातून आपला उमेदवार उतरवत ममतांना आव्हान दिलंय. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय पारा चांगलाच चढला आहे. हा विचार करुन या ठिकाणी केंद्रीय दलाच्या १५ कंपनी तैनात केल्या आहेत. या निवडणुकीनंतरच ममता बॅनर्जी यांच्या राजकीय भविष्याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झालीय.

भाजपने भवानीपूर मतदारसंघातून प्रियंका तिब्रेवाल यांना तर भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने श्रीजीत विश्वास यांना ममता बॅनर्जींविरोधात उमेदवारी दिलीय. विशेष म्हणजे काँग्रेसने या मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही. भवानीपूरशिवाय पश्चिम बंगालमधील समशेरगंज आणि जंगीपूर मतदारसंघातही पोटनिवडणूक होत आहे.

ओडिशातही पोटनिवडणुकीसाठी मतदान

ओडिशातील पुरीच्या पिपली मतदारसंघातही पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होतंय. पुरीचे पोलीस अधीक्षक कंवल विशाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार या पोटनिवडणुकीसाठी ३२ पथकं तैनात केलीत. आम्ही या निवडणुकीसाठी आवश्यक सुरक्षेची तयारी केलीय. संवेदनशील बुथवर अतिरिक्त सुरक्षा दलही तैनात केलंय, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

“पंतप्रधानांचा बंगाली लोकांवर…”; तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर बाबुल सुप्रियोंचा मोदींवर पहिला निशाणा