गिरीश कुबेर
राजीव खांडेकर
डवली हे सातारा जिल्ह्य़ातील माण तालुक्यातील गाव. या गावामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष कधी होते असे नाही; पण तरीही भविष्याची पावले आपण ओळखली पाहिजेत हे ध्यानात घेऊन गावाने पाण्याचे संवर्धन करण्याचे ठरवले. आमिर खानच्या पानी फौंडेशनच्या माध्यमातून राज्यभर घेतल्या जाणाऱ्या जलसंधारणाच्या स्पर्धेमध्ये गावाने भाग घेतला आणि पहिल्या वर्षी राज्यात दुसरा क्रमांकही पटकावला. विचारसंहितेच्या निमित्ताने सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्य़ांच्या सीमेवर असलेल्या या परिसरात फिरताफिरता आम्ही भांडवलीमध्ये येऊन पोहोचलो. दीड हजार लोकवस्तीचे हे गाव. स्वकर्तबगारीचा रास्त अभिमान असलेले. गावातील बहुतेक जण एकाच भावकीतले. सगळ्यांची आडनावे सूर्यवंशी.
महाराष्ट्रभर फिरताना प्रकर्षांने आणि सातत्याने जाणवत असलेल्या एका वास्तवाचे प्रत्यंतर या गावातही आले- शहरी आणि ग्रामीण मतदारांमध्ये पडत चाललेले वैचारिक अंतर! मागच्या एका लेखामध्ये याचा उल्लेख आला आहेच.
माणदेशातील कोणत्याही एका गावासारखे हे चिमुकले गाव आहे; पण उन्हाळ्याने आसपासचा परिसर कोरडाठाक पडलेला असताना इथली हिरवळ मात्र नजरेला सुखावून जात होती. गावाच्या वेशीवरच हनुमानाचे मंदिर होते तिथे सगळी गावकरी मंडळी प्रतीक्षा करत बसली होती. पानी फौंडेशनच्या स्पध्रेत भाग घेतल्याने गावातील मुळातच असलेली ऐक्यभावना वाढीला लागली आणि गावाच्या भल्यासाठीचे निर्णय घेणे अधिक सोपे होऊ लागले असे सुरुवातीला सगळ्यांनीच आवर्जून सांगितले. गावामध्ये कांदा, टोमॅटो, ज्वारी, बाजरी, अन्य पालेभाज्या घेतल्या जातात; पण आजवर उसाची लागवड कटाक्षाने टाळली गेली आहे. उसाच्या मोहाने आजूबाजूच्या परिसरांतील पाणीदार गावांची रुक्ष वाळवंटे कशी झाली, याची उदाहरणे सगळ्यांच्या समोरच आहेत. साहजिकच आपल्या गावाने ऊस टाळला याचा सार्थ अभिमान गावकऱ्यांना आहे. गावात मोठी दगडी विहीर आहे. गेल्या वर्षांपर्यंत इथून दररोज पंचवीस टँकर पाणी आजूबाजूला जात असे; पण भविष्यात बिकट परिस्थिती उद्भवू शकते असे दिसू लागल्यावर गावाने पाण्याचे टँकर बंद करवून टाकले. रणरणत्या उन्हात ही विहीर पाहायला गेलो तर आजही तिला जवळपास बारा-चौदा फूट पाणी दिसले. उन्हाळाभर गावाची पाण्याची गरज ही विहीर नक्की भागवणार यात शंकाच नव्हती; पण तरीही गावाला पाणीटंचाईचे संकट डोक्यावर घोंघावू द्यायचे नव्हते. पाण्याविषयी एवढी सजगता अख्खे गाव दाखवते याचेच खरे तर या वेळी अप्रूप वाटत होते.
पानी फौंडेशनने महाराष्ट्राच्या गावागावांत निर्माण केलेली ही जलजागृती ऊर भरून आणणारी आहे. डोंगरदऱ्यांतून धावणारे पाणी अडवायचे आणि अडवलेल्या पाण्याला जमिनीत मुरवून आपल्या भूजलाचा स्तर वाढवायचा यात नवे काही नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय पातळीवरून हा कार्यक्रम हाती घेतला जात आहे. आमिर खान आणि सत्यजित भटकळ यांच्या पानी फौंडेशनचे मोठेपण हे की, तिने महाराष्ट्राच्या गावागावांना शासनाच्या भरवशावर न बसता श्रमदानातून हे काम पूर्ण करण्याची प्रेरणा दिली आणि भांडवलीसारखी हजारो गावे गेल्या चार वर्षांपासून भर उन्हाळ्यामध्ये पाणी अडवण्याची कामे हाती घेत राहिली. आत्ता निवडणुकीचा मोसम असला तरी आमच्याकडच्या बऱ्याच गावांनी राजकारणाला दूर सारून पाणी अडवण्याच्या मोहिमेलाच प्राधान्य दिले असल्याचे काही गावकऱ्यांनी सांगितले. गावातील विहिरीची पाहणी करायला गेलो तर जवळच माण नदी होती. म्हसवड, आटपाडीकडे या नदीचे पात्र मोठे होते. इथे मात्र जेमतेम पंधरा-वीस फुटांचेच नदीपात्र आहे. उन्हाळ्यामुळे पूर्ण कोरडे पडलेले होते; पण तिथून शंभर फूट आल्यावर हातपंप दिसला. गंमत म्हणून हापसा दिला तर अक्षरश: अध्र्या हापशात थंडगार आणि छान गोड पाणी बदबदा वाहायला लागले. गावकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून हाती घेतलेल्या जलसंवर्धनाचे हे फळ होते.
मंदिरामध्ये ऐसपस गप्पा सुरू झाल्या. विषय स्वाभाविकच राजकारण, निवडणुकांकडे वळला आणि मघा उल्लेख केलेला शहरी-ग्रामीण भेद ठसठशीतपणे जाणवू लागला. मंदिरात जमलेले सगळे जण शुभ्र पांढऱ्या कपडय़ांमध्ये होते. बहुतेकांच्या डोक्यावर गांधी टोप्या. त्यामध्ये एकच जण सलमान खानसारखी कॅप घालून बसलेला होता. गावात शिकून पुढे एमएस्सी, एमटेक झालेला हा तरुण मुंबईत एका मोठय़ा कंपनीत नोकरीला होता. तो एकटा शहरी आणि त्याच्या भोवताली बसलेले त्याचेच गणगोत.. ते मात्र ग्रामीण. विषय केंद्रातल्या सरकारचा निघाला, भाजपचा निघाला. मोदींच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही, देशांतर्गत सुरक्षेला मोदींच्या काळात महत्त्व मिळाले आहे, पाकिस्तानी कुरघोडय़ांना मोदी सरकारनेच कणखर उत्तर दिले आहे. नोटाबंदी, जीएसटी, रस्त्याची कामे, गावागावांना वीजपुरवठा, स्वच्छतेविषयी जागृती करून समाजाच्या र्सवकष विकासासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा हा तरुण करत असताना त्याच्याच काका-मामांना मात्र यातल्या कोणत्याच गोष्टीचे अप्रूप असल्याचे दिसत नव्हते. शेतमालाचे गेल्या पाच वर्षांत पडलेले दर, कर्जमाफी मिळण्यासाठी करावी लागलेली उस्तवार, दुधासाठी पाच रुपयांचे अनुदान देण्याच्या घोषणेचे हवेत विरून जाणे या त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी होत्या. देशाचा विकास झाला असे तुम्ही म्हणता, पण तो आमच्या घरामध्ये आलेला दिसतोय का, त्याच्यामुळे आमचा आíथक स्तर सुधारला का, हे त्यांचे रोकडे सवाल होते. पाच वर्षांपूर्वी शहरात गेलेल्या पोरांना महिन्याला बारा हजार रुपये पगार मिळत असेल तर आज त्याला पंधरा हजार रुपये मिळू लागलेत. शहरातल्या लोकांचे बरे असते. नोकरी कोणतीही असो, त्यांना दर वर्षी मिळणाऱ्या वेतनात थोडीफार का होईना पण वाढ होते. शेतकऱ्यांचे काय? त्यांच्या उत्पन्नात वाढ होणे राहिले बाजूलाच, उलट त्यामध्ये घट झाल्याचेच आपल्याला पाहायला मिळते. ही स्थिती असेल तर देशाचा विकास होतोय म्हणत आम्ही नाचायचे का, हा त्यांचा प्रश्न होता. त्याचे उत्तर अर्थातच सोपे नव्हते.
मंदिरातून बाहेर पडायची वेळ झाली तेव्हा एक म्हातारबुवा तिथे येऊन बसले. त्यांचे नाव जगन्नाथ भोसले. उंच, धिप्पाड देहयष्टी. त्यांचा चेहरा मुळातच मोठा होता, पण त्यावर डोक्याला बांधलेल्या भल्यामोठय़ा मुंडाशामुळे ते आणखी मोठे दिसत होते. ग्रामीण भागाकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे वैषम्य त्यांनी खणखणीत आवाजात बोलून दाखवले आणि यवतमाळच्या टिटवीनामक आडगावातील शेतकऱ्याने बोलून दाखवलेली भावना या म्हातारबुवांनीही बोलून दाखवली. सरकार पात्र (जेवणासाठीचे पान) मांडून ठेवतंय, पण दिसभर जेवायाच वाढीत नाही..! टिटवीकर शेतकरी आणि या म्हातारबुवांमध्ये फरक एवढाच होता की, त्या शेतकऱ्याचे तोंडाचे बोळके होते आणि भोसले आजोबांच्या तोंडात वयाच्या ८९व्या वर्षी सगळेच्या सगळे दात होते! (क्रमश:)
girish.kuber@expressindia.com
rajivk@abpnews.in
@girishkuber
@rajivkhandekar