नवी दिल्ली : दिल्लीतील उत्तर-पूर्व मतदारसंघातून काँग्रेसचे तरुण नेते कन्हैया कुमार यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस चर्चेत राहण्याची शक्यता वाढली आहे. आम आदमी पक्ष (आप) व भाजपच्या उमेदवारांचा प्रचारदेखील सुरू झाला, पण दीड महिने काँग्रेसने तीन मतदारसंघांमध्ये उमेदवार घोषित केले नव्हते. आता कन्हैया कुमार थेट दिल्लीतून मोदी व भाजपविरोधात आक्रमक प्रचार करण्याची शक्यता असल्याने काँग्रेसकडे अधिक लक्ष वेधले जाऊ शकेल असे मानले जाते.

दिल्लीतील ७ जागांपैकी ३ जागा काँग्रेसच्या वाटयाला आल्या आहेत. उर्वरित ४ जागांवर ‘आप’ने गेल्या महिन्यातच उमेदवार जाहीर केले होते. भाजपच्याही सात उमेदवारांचा जोमाने प्रचार सुरू आहे. त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक झाल्यामुळे चार आठवडयांपासून दिल्लीत भाजप विरुद्ध ‘आप’ अशी थेट लढाई होत असल्याचे चित्र दिसत होते. शिवाय, काँग्रेसने अंतर्गत मतभेदांमध्ये उत्तर-पूर्व, चांदनी चौक आणि उत्तर-पश्चिम या तीनही मतदारसंघांमध्ये उमेदवारांची निवड करण्यात दिरंगाई केली. त्यामुळे दिल्लीत भाजप व ‘आप’च्या तुलनेत काँग्रेस प्रचारात मागे पडल्याचे मानले जात होते.

हेही वाचा >>> पंतप्रधान मोदींना राहुल गांधींचं आव्हान; म्हणाले, “फक्त एवढंच समजून सांगा…”

उत्तर-पूर्व भागामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा आदी प्रामुख्याने पूर्वाचली मतदारांचे प्राबल्य असून भाजपचे मनोज तिवारी यांच्या अभिनिवेशपूर्ण भाषणांकडे मतदार आकर्षित होत असल्याचे पाहायला मिळते. तिवारी यांच्याविरोधात काँग्रेसनेही तितकेच आवेशपूर्ण भाषण करणारे व मोदी-शहांविरोधात थेट बोलणारे कन्हैयाकुमार यांना या मतदारसंघातून उतरवल्यामुळे त्यांच्या प्रचाराची उत्सुकता निर्माण झाली आहे. कन्हैया कुमार यांच्या उमेदवारीवर मनोज तिवारींनी अजून प्रतिक्रिया दिलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसमध्ये कन्हैया कुमार यांना उमेदवारी देण्यास विरोध होता, पण राहुल गांधी यांच्या आग्रहामुळे त्यांना उत्तर-पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचे सांगितले जाते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत कन्हैया कुमार यांनी बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण त्यांचा भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीराज सिंह यांनी पराभव केला होता. यावेळीही कन्हैया कुमार यांना बेगुसरायमधून निवडणूक लढवण्याची इच्छा होती, पण ‘महागठबंधन’च्या जागावाटपामध्ये ही जागा काँग्रेसला मिळू शकली नाही. उत्तर-पूर्व मतदारसंघातून कन्हैया कुमार यांच्यासह अरविंदर लव्हली व अनिल चौधरी यांच्या नावाची चर्चा होती. चांदनी चौकातून अलका लांबा, संदीप दीक्षित, जे. पी. अगरवाल हे तिघे उत्सुक होते. उत्तर-पश्चिम या अनुसूचीत जातींसाठी राखीव मतदारसंघामध्ये राजकुमार चौहान व उदीत राज यांचा विचार केला गेला. उत्तर-पश्चिम मतदारसंघामध्ये उदीत राज व चांदनी चौकातून जे पी अगरवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.