नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने (आप) मंगळवारी दिल्लीतील नवी दिल्ली, पूर्व दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पश्चिम दिल्ली या चार तर, हरियाणातील एका जागेवर उमेदवारांची घोषणा केली. दिल्लीत ३ जागांवर विद्यामान आमदारांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर, हरियाणातील कुरुक्षेत्र मतदारसंघात राज्यसभेचे विद्यामान खासदार सुशील कुमार गुप्ता यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

‘आप’चे मालवीय नगरचे आमदार सोमनाथ भारती यांना नवी दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघामध्ये भाजपच्या मीनाक्षी लेखी खासदार आहेत. कोंडलीचे विद्यामान आमदार कुलदीप कुमार हे पूर्व दिल्लीतून भाजपचे गौतम गंभीर यांच्याविरोधात लढतील. दक्षिण दिल्लीत तुघलकाबादचे आमदार साहीराम पहलवान यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात भाजपचे रमेश बिधुरी खासदार आहेत. पश्चिम दिल्लीतील काँग्रेसचे माजी खासदार महाबल मिश्रा हे याच मतदारसंघातून ‘आप’कडून निवडणूक लढवतील.

हेही वाचा >>> ‘इंडिया’ला पराभवाची खात्री! पंतप्रधान मोदींची केरळ, तमिळनाडू दौऱ्यात विरोधकांवर टीका

नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसदरम्यानही चर्चा

श्रीनगर : इंडिया आघाडीची स्थापना लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी करण्यासाठी झाली आहे, मित्र पक्षांच्या जागा घटवण्यासाठी नाही असे जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमार अब्दुल्ला मंगळवारी म्हणाले. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसदरम्यान जागावाटपाची दुसरी फेरी पुढील आठवड्यात होणार आहे. जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये दोन्ही पक्ष आणि मेहबुबा मुफ्ती यांचा ‘पीडीपी’ एकत्रितरित्या निवडणूक लढवणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केरळमध्ये ‘माकप’चे १५ उमेदवार जाहीर

तिरुवअनंतपुरम : केरळमध्ये मंगळवारी ‘माकप’ने लोकसभेच्या १५ मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली. त्यामध्ये चार विद्यामान आमदारांचा समावेश आहे. माजी आरोग्यमंत्री के के शैलजा आणि माजी अर्थमंत्री टी एम थॉमस आयझॅक यांचा त्यामध्ये समावेश आहे. डाव्या आघाडीचा दुसरा घटक पक्ष ‘भाकप’ने सोमवारीच चार उमेदवार जाहीर केले आहेत.