निमा पाटील, लोकसत्ता

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये अत्यंत चुरशीची लढत अपेक्षित असून, गतवेळपेक्षा चांगली कामगिरी करण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यंदा अधिकच सावध झाल्या आहेत. संदेशखाली घटनेचा लाभ उठविण्यासाठी भाजपने पिडीतेला उमेदवारी देऊन महिलांची मते आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

पश्चिम बंगालच्या ४२ लोकसभा जागांवर सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असलेला भाजप यांच्यामध्ये मुख्य लढत असेल. तृणमूल ‘इंडिया’ आघाडीबरोबर असल्या तरी स्वबळावर लढत आहे. २०१९चा निकाल पाहिला तर, त्यावेळी तृणमूलला २२, भाजपला १८ आणि काँग्रेसला २ जागांवर विजय मिळाला होता. जवळपास तीन दशके राज्यात सत्ता राबवलेल्या डाव्या पक्षांना एकही जागा मिळाली नव्हती.

संदेशखालीमधील महिलांवर झालेल्या अत्याचाराचा भाजपने पद्धतशीरपणे फायदा उठविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आयताच हा विषय मिळाला आहे. पिडीतेला उमेदवारी देऊन भाजपने वेगळा संदेश दिला आहे. पश्चिम बंगाल दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात संदेशखालीवरच अधिक भर दिला होता.

हेही वाचा >>> मोले घातले लढाया :मोदींचे ‘उज्ज्वला’ मंत्री..

राजकीय भौगोलिकदृष्टया पश्चिम बंगालमध्ये गंगेचे खोरे आणि मिदनापूर हे दोन महत्त्वाचे भाग आहेत. त्याबरोबरच उत्तर बंगालमध्ये जलपायगुडी आणि दक्षिण बंगालमध्ये मातुआ पट्टा हेदेखील राजकीयदृष्टया महत्त्वाचे मानले जातात. राज्यातील १० जागा अनुसूचित जातींसाठी तर दोन जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत.

गंगेच्या खोऱ्यामध्ये दक्षिण आणि उत्तर २४ परगणा, कोलकाता, हावडा आणि हुगळी हे पाच जिल्हे आणि १६ लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी गेल्या निवडणुकीत भाजपला तीन जागा मिळाल्या होत्या. हा संपूर्ण भाग एरवी तृणमूल काँग्रेसच्या वर्चस्वाखाली येतो. मात्र, राज्य सरकारविरोधातील भावना आणि खासदारांची निराशाजनक कामगिरी विचारात घेऊ पक्षाने सहा मतदारसंघांमधील उमदेवार बदलले आहेत.

हिंसाचारग्रस्त संदेशखाली ज्या त्तर २४ परगणा जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यात तीन नवीन चेहरे देण्यात आले आहेत. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील दोन तर हुगळीतील एक उमेदवार बदलले आहेत. २०२१च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसी उत्तर २४ परगणामधील ३३पैकी २७ आणि अल्पसंख्यांकबहुल दक्षिण २४ परगणामधील ३१पैकी ३० जागा जिंकल्या होत्या. तसेच कोलकाता, हावडामधील सर्व तर हुगळीमधील १८पैकी १४ जागा टीएमसीकडेच गेल्या होत्या. तृणमूूल काँग्रेसने सर्व ४२, भाजपने २२ तर डाव्या आघाडीने १६ उमेदवार जाहीर केले आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नागरिकत्व कायद्याचा मुद्दा उचलून धरला होता. त्यामुळे निर्वासित, विशेषत: मातुआ समुदाय भाजपच्या पाठीशी राहिला आणि बोनगाव लोकसभा मतदारसंघात भाजपला विजय मिळवता आला. याही निवडणुकीत सीएएमुळे ध्रुवीकरण होऊन त्याचा लाभ मिळेल अशी आशा भाजपला आहे, तर त्यामुळे उडालेल्या गोंधळाचा फायदा घेण्यासाठी तृणमूल काँग्रेस प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

भाजपचे उत्तर भागात प्राबल्य 

पश्चिम बंगालमधील डोंगरदऱ्यांचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जलपायगुडी विभागात अलीपुरद्वार, कूचबिहार, दार्जिलिंग, कालिमपाँग आणि जलपायगुडी हे पाच जिल्हे आहेत. पाच जिल्ह्यांमध्ये मिळून चार जागा असून गेल्या वेळी भाजपने त्या सर्व जिंकल्या होत्या. हा भाग २०१९पासूनच भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. उत्तर बंगालमधील जनतेमधील उपेक्षेच्या भावनेचा पक्षाला फायदा झाल्याचे दिसते. या प्रदेशाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची मागणी भाजपने उचलून धरली आहे. त्यामुळे भाजप राज्याचे विभाजन करत असल्याचा टीएमसीचा आरोप आहे. भाजपच्या दृष्टीने जलपायगुडीमधील खासदारांची निष्क्रियता चिंतेत टाकणारी आहे. तर, सीएएच्या अंमलबजावणीमुळे फायदा मिळण्याची अपेक्षा आहे. राणाघाट आणि कृष्णानगर या दोन मतदारसंघात मातुआची लोकसंख्या लक्षणीय आहे.

आदिवासी मतदारसंघांवर तृणमूल काँग्रेसची भिस्त

राज्यातील आदिवासी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिदनापूरमध्ये बांकुरा, पश्चिम मिदनापूर, पूर्व मिदनापूर, पुरुलिया आणि झारग्राम हे पाच जिल्हे आहेत. पाच जिल्ह्यांमध्ये मिळून आठ लोकसभा मतदारसंघ आहेत. गेल्या वेळी भाजपने येथे पाच तर तृणमूलने तीन जागांवर विजय मिळवला होता. सुवेंदू अधिकारी भाजपकडे गेल्यानंतर तृणमूलने या भागात कुर्मी आणि महातोंना लक्ष्य करून आपली पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

२०१९ चा निकाल

एकूण

जागा ४२

तृणमूल – २२

भाजप – १८

काँग्रेस – २

डावे – ०