Lokpal of India Asks for BMW 3 Series Cars: १३ वर्षांपूर्वी दिल्लीच्या जंतरमंतरमध्ये अण्णा हजारेंनी उभारलेल्या आंदोलनाचा परिपाक म्हणून देशात लोकपाल संस्थेची स्थापना झाली. सरकारी, खासगी वा सार्वजनिक पातळीवर होणाऱ्या भ्रष्टाचारावर वचक बसावा, कारवाई व्हावी व गैरप्रकार आटोक्यात यावेत याची प्रमुख जबाबदारी लोकपाल संस्थेवर टाकण्यात आली. हे लोकपाल आता राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलं आहे. पण कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकारणामुळे लोकपालची चर्चा नसून BMW कार्समुळे लोकपालची चर्चा सुरू झाली आहे. लोकपालने आपल्या सात सदस्यांसाठी बीएमडब्ल्यू कारच्या अत्याधुनिक मॉडेलची मागणी केली आहे. या कार्सची किंमत तब्बल ५ कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे.
BMW 330Li सीरिजच्या कार्सची मागणी
इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, लोकपालच्या सात सदस्यीय समितीने आपल्या सर्व सदस्यांसाठी बीएमडब्लू कार्सची मागणी केली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर राष्ट्रीय लोकपालचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निर्णयानंतर या निविदा मागवण्यात आल्यावर आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निविदा भरण्यासाठी ६ नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली असून कंपन्यांना १० लाखांची अनामत रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले आहे. ७ नोव्हेंबर रोजी सर्व निविदा उघडल्या जातील.
“केंद्रीय लोकपाल आयोगाला ७ BMW 3 330Li सीरिजच्या कार्स पुरवण्यासाठी लोकपालकडून प्रथितयश कंपन्यांकडून खुल्या निविदा मागवल्या जात आहेत. या सर्व कार्स सप्लाय ऑर्डर जारी झाल्यानंतर पुढच्या दोन आठवड्यांच्या आत लोकपालकडे सुपूर्द कराव्यात. मात्र, सप्लाय ऑर्डरच्या ३० दिवसांपेक्षा जास्त उशीर करू नये. त्यानंतर कोणत्याही प्रकारे मुदत वाढवून दिली जाणार नाही”, असं लोकपालकडून जारी करण्यात आलेल्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
केंद्रीय लोकपालमध्ये कोण सदस्य आहेत?
केंद्रीय लोकपालसाठी ८ सदस्यांची मंजुरी आहे. मात्र, सध्या लोकपालमध्ये ७ सदस्य आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती खानविलकर हे लोकपालचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासह अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती संजय यादव, कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी, माजी न्यायमूर्ती एल. नारायण स्वामी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा, गुजरातचे माजी मुख्य सचिव पंकज कुमार आणि केंद्रीय महिला व बाल कल्याण विभागाचे माजी सचिव अजय टिकरे हे लोकपालचे सदस्य आहेत.
या प्रकरणी न्यायमूर्ती खानविलकर किंवा इतर सदस्यांच्या प्रतिक्रिया मिळू शकल्या नसल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे भारताच्या विद्यमान सरन्यायाधीशांना मर्सिडीज कार देण्यातआली असून सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायमूर्तींना BMW 3 सीरिजमधील तीच कार देण्यात आली आहे, ज्यासाठी सध्या लोकपालने मागणी केली आहे.
लोकपालच्या मागणीवर टीका
दरम्यान, केंद्रीय लोकपालने BMW कार्सची मागणी करण्यावर टीकादेखील होऊ लागली आहे. बीएमडब्लू कारपेक्षा भारतीय गाड्यांना प्राधान्य दिलं जायला हवं, अशी भूमिका नीती आयोगाचे माजी सीईओ आणि इंडिया जी-२० चे प्रमुख अमिताभ कांत यांनी मांडली आहे. दुसरीकडे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये “आता लोकपालचे सदस्य स्वत:साठी ७० लाखांच्या गाड्या खरेदी करू लागले आहेत”, अशी टिप्पणी केली.