साखर सम्राटाकडून तडजोड करुन आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर केला आहे. यातील खरे-खोटेपणा करण्यासाठी त्यांनी ऐतिहासिक बिंदू चौकातील व्यासपिठावर यावे, असे आव्हान खासदार शेट्टी यांनी येथे दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी भ्रष्टाचार करुन घरे भरल्याचे पुरावे देण्याची तयारी त्यांनी दाखवली.
राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांचा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी खासदार शेट्टी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. साखर कारखानदारांबरोबर मी सेटेलमेंट केली असा आरोप महसूल मंत्री पाटील यांनी केला आहे. केवळ आरोप करण्यापेक्षा त्यांनी तो सिद्ध करुन दाखवावा, असे आव्हान शेट्टी यांनी दिले. आज त्यांच्या भाजपच्या कळपात १०० साखर सम्राट आहेत. त्यांची मदत त्यांनी घ्यावी, असा सल्लाही शेट्टी यांनी पाटील यांना दिला.
चंद्रकांतदादा राज्यातील दोन नंबरचे मंत्री आहे. दोन नंबरचे म्हणजे अवैध धंदे करणारे मंत्री असा मी अर्थ लावतो, असा घणाघात शेट्टी यांनी मंत्री पाटील यांच्यावर केला. माझ्यावरील आरोप, माझी मालमत्ता तपासण्यासाठी तुमच्याकडे प्राप्तिकर विभाग, इडी, सीबीआय असे अनेक विभाग आहेत. त्यांच्याकरवी धाडी टाका आणि जनतेला वस्तुस्थिती सांगा. माझ्याकडेही कोणीकोणी दिलेले दादांच्या विरोधातील पुरावे आहेत. त्यांनी बिंदुचौकात समोरासमोर यावे, तेथेच सोक्षमोक्ष होऊन जाईल. सार्वजनिक जीवनात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे जीवन उघड्या पुस्तकासारखे असावे. त्यांची सगळी माहिती जनतेला असली पाहिजे असा माझा आग्रह आहे, असेही शेट्टी यांनी नमूद केले.