scorecardresearch

भाजपच पहिल्या क्रमांकावर राहील!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

भाजपच पहिल्या क्रमांकावर राहील!

|| सौरभ कुलश्रेष्ठ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

लक्ष्यभेदी हल्ला, बालाकोटवरील हवाई हल्ले या राष्ट्रवादाच्या मुद्दय़ांच्या नंतर सर्वाधिक प्रतिसाद हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरील टीकेला मिळतो. त्यांच्या सत्ताकाळातील कारभाराबाबतची नाराजी अजूनही असल्याचे त्यातून दिसून येते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत केले. तसेच भाजप राज्यात पहिल्या क्रमांकावर राहील असा विश्वस त्यांनी व्यक्त केला.  शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांत ९० टक्के मनोमीलन झाल्याचे सांगताना भाजपने जाणीवपूर्वक जाहिराती कमी व लोकांमध्ये थेट जाऊन प्रचार जास्त असे धोरण ठेवल्याचेही नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तुमचा व युतीच्या नेत्यांच्या भाषणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच टीकेचा रोख का?

शरद पवार हे रोज सांगतात की मोदी सरकारच्या विरोधात महाआघाडी आपणच उभी केली. महाराष्ट्रात तर काँग्रेसकडे नेतृत्व नसल्याने पवार हेच काँग्रेस चालवतात असे बोलले जात आहे. त्यामुळे विरोधकांचे नेतृत्व या नात्याने शरद पवार हेच युतीच्या प्रचारात लक्ष्य ठरतात. विशेष म्हणजे आमच्या भाषणात सर्जिकल स्ट्राइक, बालाकोटवरील हवाई हल्ले या राष्ट्रवादाच्या मुद्दय़ांच्या नंतर सर्वाधिक प्रतिसाद हा शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरील टीकेला मिळतो.

गेल्या काही दिवसांत पवार आणि भाजप यांच्यातील वाक्युद्धातील भाषा खाली घसरत चालल्याचे दिसत आहे?

शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची विधाने ही पातळी सोडून होत आहेत याचाच अर्थ त्यांना पराभवाची चाहूल लागली आहे. यंदाची निवडणूक ही त्यांच्या अस्तित्वासाठी महत्त्वाची असताना पराभव समोर दिसत असल्याने पवार यांच्या सदसद्विवेकबुद्धीने काम करणे बंद केल्यानेच पवार यांच्याकडून पातळी सोडून राजकीय टीका होत आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेले विधान पाहता, त्यांना उमेदवारी देऊन चूक झाली आहे का?

साध्वी प्रज्ञासिंह यांचे विधान योग्य नाही. हेमंत करकरे हे पोलीस दलातील उमदे व प्रामाणिक अधिकारी होते. त्यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यामुळे त्यांच्याबद्दल साध्वी यांनी विधान करणे चुकीचे आहे. अर्थात त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी देणे चुकीचे होते असे म्हणता येणार नाही. त्या आरोपी असल्या तरी एनआयएने आपल्या आरोपपत्रात त्यांना निर्दोषत्व दिले आहे. या उलट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जामिनावर आहेत. मालेगाव स्फोटाच्या काळात मुस्लीम समाज काँग्रेसवर चिडलेला होता. त्या वेळी खूप दहशतवादी करवाया सुरू असल्याने त्या काळात अनेकांना पोलीस ताब्यात घेत होते. आमच्या मुलांना उचलून नेतात अशी तक्रार मुस्लीम करत होते. त्यांचा राग शांत करण्यासाठीच हिंदू दहशतवाद ही संकल्पना पुढे आणली गेली. प्रज्ञासिंह यांना अटक झाली.

नोटाबंदीचा फटका बसल्यामुळे राज ठाकरे नाराज!

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे साटेलोटे असून विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे हे आघाडीसोबत गेलेले दिसतील, असे भाकीत फडणवीस यांनी व्यक्त  केले. पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारे राज ठाकरे नाराज का झाले, विरोधात का गेले याबाबत विचारता, २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा धुव्वा उडाला. त्यानंतर मुंबई महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका अशा सर्वच निवडणुकांत मनसेचे नामोनिशाण उरले नाही. शिवाय नोटाबंदीचाही बहुधा राज ठाकरे यांना फटका बसल्याने राज ठाकरे आमच्यावर नाराज झाले, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या सभांचा कसलाही परिणाम मतदानावर होणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

नांदेडमध्ये भाजपच्या उमेदवारामुळे अशोक चव्हाणांना मतदारसंघातच अडकून पडावे लागले. बारामतीमध्ये कांचन कुल यांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान उभे केले असून मावळमधून लढणाऱ्या पुत्र पार्थ पवार यांचा प्रचार सोडून इतरत्र जाण्याची संधी अजित पवार यांना मिळत नाही. हे चित्र बोलके असून निकालात त्याचे प्रतिबिंब दिसेल.

भाजप सरकारविरोधात टीका करण्यासाठी काही मुद्दे हाती न लागल्याने शेवटचा पर्याय म्हणून विरोधकांनी जातीपातीचे राजकारण सुरू केले. या राजकारणाला आम्ही राष्ट्रावादाने उत्तर देत आहोत. नितीन गडकरी यांच्या निवडणुकीत विरोधकांनी जातीचा विषय प्रचारासाठी काढला असला तरी गडकरी हे प्रचंड मतांनी निवडून येतील. विरोधकांची तोंडे बंद करतील.

 

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या