एपी, स्टॉकहोम
जॉन क्लार्क, मायकेल डेव्होरेट आणि जॉन मार्टिनिस या अमेरिकेतील तीन शास्त्रज्ञांना मंगळवारी भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले. ‘इलेक्ट्रिक सर्किट’मधील ‘मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग’ आणि ऊर्जा परिमाणीकरण (एनर्जी क्वांटिजेशन) यातील संशोधनासाठी तिघांना नोबेल जाहीर झाले. या संशोधनामुळे डिजिटल तंत्रज्ञानाला चालना मिळाली आहे.

जॉन क्लार्क, जॉन मार्टिनिस यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून संशोधन केले. मायकेल डेव्होरेट यांनी येल आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून संशोधन केले. भौतिकशास्त्रासाठीच्या नोबेल पुरस्काराच्या समितीचे अध्यक्ष ओले एरिक्सन म्हणाले, ‘शास्त्रज्ञांनी १९८०च्या दशकात हे संशोधन केले. पुढील पिढीचे क्वांटम तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्यामुळे संधी निर्माण झाल्या. त्यात ‘क्वांटम क्रिप्टोग्राफी’, ‘क्वांटम कम्प्युटर्स’ आणि ‘क्वांटम सेन्सर्स’ यांचा समावेश आहे. शंभरहून अधिक वर्षांपूर्वीचे ‘क्वांटम मेकॅनिक्स’ आजही नवनवी आश्चर्य दाखवीत आहे. या तंत्रज्ञानाला पुरस्कृत करणे खरेच आनंदाचे आहे. हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा सारा पाया म्हणजे ‘क्वांटम मेकॅनिक्स’ आहे.’ गेल्या वर्षी कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडित संशोधन करणारे जोन होपफिल्ड आणि जॉफ्री हिंटन यांना नोबेल जाहीर झाले होते.

या आठवड्यात नोबेल सन्मान जाहीर केले जात आहेत. मेरी ई ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल, शिमोन साकागुची यांना सोमवारी वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले. यातील मेरी ब्रुंको आणि फ्रेड रॅम्सडेल अमेरिकेचे असून, साकागुची जपानचे आहेत. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल सन्मान बुधवारी जाहीर होणार आहे. साहित्यासाठीचे नोबेल गुरुवारी आणि शांततेसाठीचा नोबेल सन्मान शुक्रवारी जाहीर होणार आहे. अर्थशास्त्रासाठीचे नोबेल १३ ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. या वर्षी १० डिसेंबर रोजी नोबेल सन्मान दिले जाणार आहेत.

माझ्या आयुष्यातील हे एक आश्चर्य आहे. इतर दोन शास्त्रज्ञांचेही या संशोधनात मोलाचे योगदान आहे. आमचे संशोधन एका अर्थाने ‘क्वांटम कम्प्युटिंग’चा पाया होते. या क्षणी हे संशोधन नक्की कुठे लागू होते, हे मला स्पष्ट होत नाही. मात्र, सध्या मी ज्या मोबाइलवर बोलत आहे, ते अशा प्रकारच्या संशोधनामुळे चालतात. – जॉन क्लार्क, शास्त्रज्ञ, नोबेलविजेते